Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वर्गीकरणाच्या विषयांवरून सभागृहात विरोधकांची “आदळआपट”

  • काहींना डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतल्याचा आरोप
  • सत्ताधा-यांनी मतदानाची शिष्टाई गुडाळली बासनात
  • 250 कोटींच्या वर्गीकरणाला उपसूचनेसह दिली मान्यता

पिंपरी – विकास कामांच्या नावाखाली आयुक्तांनी महासभेच्या मान्यतेसाठी ठेवलेले 250 कोटींचे वर्गीकरणाचे विषय हाणून पाडण्यासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सभागृहात आदळआपट केली. या विषयांवरून विरोधकांनी महापौरांना महासभेतच रोखण्याचा प्रयत्न केला. विरोध वाढू लागल्याने महापौर काळजे यांनी यावर मतदान घेण्याची घोषणा केली. मतदान घेण्याची शिष्टाई दाखविण्यापूर्वीच प्रशासनाला साजेशी भूमिका घेत वर्गीकरणाच्या विषयांना उपसूचनेसह मान्यता देण्यात आली.

भोसरीतील रुग्णालयांचे अर्धवट काम, आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्राची दुरवस्था, दिघी-आळंदी रस्त्यावरील समुहशिल्पाच्या रखडलेल्या कामांसह शहरात नागरी सुविधांचा खेळखंडोबा झालेला असताना आयुक्तांनी 250 कोटींच्या वर्गीकरणाचे विषय महासभेपुढे ठेवले होते. काही ठराविक नगरसेवकांची मर्जी राखण्यासाठी आयुक्तांनी हे वर्गीकरण करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. असा आरोप करत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी या विषयांना विरोध करत सभागृहात गोंधळ घातला. महापौर नितीन काळजे या विषयांना मंजुरी देण्याच्या भूमिकेत होते. तेवढ्यात विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी धाव घेऊन महापौरांचा राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विरोधक नगरसेवकांनी महापौरांसमोर नारेबाजी केली. एवढा तिव्र विरोध होत असताना महापौरांनी वर्गीकरणाच्या सर्व विषयांना मान्यता दिली.

विरोधी पक्षनेते साने म्हणाले की, आयुक्तांनी पाच विषय महासभेपुढे मंजुरीसाठी आणले आहेत. त्याला मंजुरी देण्याचा घाट घातला जात आहे. शहरातील समस्या सोडून या विषयांना मंजुरी देण्याची काय गरज आहे. हे विषय तातडीने मागे घेण्याची मागणी त्यांनी केली. अजित गव्हाणे म्हणाले की, 250 कोटींच्या वर्गीकरणाचे प्रशासकीय विषय महासभेपुढे चुकीच्या पध्दतीने आणले आहेत. काही मोजक्या नगरसेवकांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या प्रभागातील विकास कामांसाठी हे वर्गीकरण होत आहे. आयुक्तांवर राजकीय दबाव वाढत असल्यामुळे त्यांनी हे विषय आणल्याचा आरोप त्यांनी केला.

एकनाथ पवार म्हणाले, पक्ष बघून, माणून बघून किंवा ठराविक व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून हे विषय सभागृहासमोर आणलेले नाहीत. याबाबत कोणीही गैरसमज करून घेऊ नये. सर्वच प्रभागांचा विकास साधण्याची भूमिका भाजपची आहे. यानंतर महापौर काळजे यांनी या विषयांना मंजुरी देत असल्याचे जाहीर केले.

20 नंबरच्या विषयावर विरोधकांनी मतदानाची मागणी केली. त्यावर उपसूचनेसह मंजूर करण्याच्या बाजूने 66 तर विरोधाच्या बाजूने 37 मतदान झाले. महापौरांनी हा विषय मंजूर केला. त्यानंतर लगेच 21 क्रमांकाचा विषय देखील मंजूर केला. त्याला विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोधाची भूमिका घेत महापौरांसमोर धाव घेतली. राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, या गोंधळातच महापौरांनी विषय रेटून मंजूर केले. सभा संपल्यानंतर विरोधकांनी सभागृहात भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group