अखंड योग साधना हाच निरोगी आरोग्याचा मंत्र – अमित गोरखे

नॉव्हेल इंटरनॅशनल स्कुलमध्ये योग दिन उत्साहात साजरा
पिंपरी – योग ही संपूर्ण जगाला भारताने दिलेली देणगी आहे. योगासनामुळे शरीर व मनाला चैतन्यमय स्फूर्ती मिळते. अखंड योग साधना हाच निरोगी आरोग्याचा मंत्र आहे, असे मत नॉव्हेल इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी व्यक्त केले. चिंचवड येथील नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी योगाचे विविध प्रकारांची प्रात्याक्षिके केली. त्यामध्ये ताडासन, वज्रासन, पद्मासन, सूर्यनमस्कार या प्रकारांचा समावेश होता. यावेळी प्राचार्या डॉ. कांचन देशपांडे, शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख महेश नलावडे, पवित्र पवार, श्वेता गुर्जर, प्रितम क्षीरसागर, अमित हिलाळ आदी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना योग व योगदिनाची माहिती सांगताना अमित गोरखे म्हणाले की, योगगुरु रामदेव बाबा यांनी सर्व लोकांना योगाचे महत्व पटवून दिले आहे. योगामुळे शारीरिक, तसेच मानसिक ताण हलका होण्यास मदत होते. याचे महत्व सर्व जनमानसात वाढल्यामुळेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व योगगुरु रामदेव बाबा यांच्या पुढाकाराने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर “जागतिक योग दिन” म्हणून जाहीर करण्यात आला.
यावेळी गोरखे यांनी रोज किमान २१ सूर्य नमस्कार घालावेत असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. सर्व विद्यार्थ्यांनी “आम्ही रोज २१ सूर्यनमस्कार घालू” असे वचन दिले.





