… अन् कॅन्सरग्रस्त बायकोला रुग्णालयात सोडून नवरा फरार ; दोन्ही मुलांना अनाथ आश्रमात केले दाखल

पिंपरी (विकास शिंदे) – सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून महिला पुजा करतात. परंतू, कॅन्सरच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुकशानाला वाईट अनुभव आला आहे. तिच्या नव-याने रुकसानाला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु असताना एकटे सोडून पळ काढला आहे. तसेच त्यांच्या सुखी संसाराचा डाव अर्ध्यावर सोडत दोन्ही मुलांना त्याने अनाथ केले आहे. सध्या रुकसाना वायसीएम रुग्णालयात मरणाच्या यातना भोगत असून अरमान, अंजूमला शिवाजीनगरच्या अनाथ आश्रमात जाण्याची वेळ आली आहे.
वैजापुर (औरंगाबाद) मधील रुकसानांची सिध्दार्थनगरच्या (उत्तरप्रदेश) असलेल्या सलीम शेख यांच्याशी ओळख झाली. त्या ओळखीची रुपातंर प्रेमात झाले. त्या दोघांनी लग्नही केले. दोन वेळच्या पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी भटकून सलीम व रुकसाना मदारीच्या करमणुकीचे खेळ करीत होते. त्यावरच तब्बल दहा ते बारा वर्षे संसाराचा गाडा हाकत होती. त्या दोघांच्या सुखी संसारात अरमान, अंजूम अशी एक मुलगा व मुलगीही त्यांना झाली. त्या मुलांना घेवून गावोगावी भटकत ते उदरनिर्वाह करीत होते.
मदारीच्या करमणुकीचे खेळ करीत ते दोघे पुण्यात आले. गेल्या दोन महिन्यापासून कासारवाडीत वास्तव्य करु लागले. दररोज सकाळी लवकर उठून शहरातील चैाकाचैाकात मदारीच्या करमणुकीचे खेळ करुन नागरिकांकडून मिळणा-या तुंटपुज्या पैशावर चैाघांच्या पोटांची भूक भागवित होते. चैाघे अगदी आनंद राहत होते. मात्र, त्यांच्या सुखी संसारात अचानक विरजन पडले होते. रुकशाना सतत आजारी पडू लागली. एकवेळही पोटाची भ्रांत असलेल्या सलीमकडे तिच्यावर उपचार करण्याची ऐपत नव्हती.
त्यामुळे पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मती रुग्णालय (वायसीएम) सलीमने रुकसानाला उपचारासाठी 28 एप्रिलला दाखल केले. तेव्हा तिला कॅन्सर झाल्याचे सलीमला समजताच, त्याने रुकसानासह दोन्ही मुलांना सोडून पळ काढला आहे. तो अद्याप रुग्णालयाकडे फिरकला देखील नाही. सध्या रुकसाना वायसीएमच्या आयसीयू दोनमध्ये मरण यातना भोगत आहे. तर रिअल लाईफ रिअल पिपल संस्थेकडून रुकसानाची काळजी घेतली जात आहे.
दरम्यान, रुकसाना व सलीमला दांपत्यला अरमान (वय 7) तर अंजुम (वय 5) एक मुलगा व एक मुलगी आहे. त्या दोघांनाही पुण्याच्या महिला व बालकल्याण समितीकडे अर्ज करुन अनाथ आश्रमात ठेवण्यात येणार आहे.सध्यस्थिती रिअल लाईफ रिअल पिपल संस्थेचे एम हुसैन, वायसीएमचे समाजसेवक महादेव बोत्रे, वर्षा भोसले त्या दोन्ही मुलांची काळजी घेत आहेत.
.





