breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट; परमबीर यांचे गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलीस दलातील निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे. दरम्यान, गृहमंत्री देशमुख यांनी हे आरोप फेटाळत स्वतःचा बचाव करण्यासाठी परमबीर सिंग खोटा आरोप करत असल्याचे म्हटले आहे.

मुंबईच्या आयुक्तपदावरून गृहरक्षक दलात बदली झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या आठ पानी पत्रात गृहमंत्री देशमुख यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. त्यात ‘दरमहा १०० कोटी रुपये जमवून द्या. मुंबईतली १७५० मद्यालये, पब, हुक्का पार्लर यांच्याकडून महिन्याला दोन ते तीन लाखांचा हप्ता घेतल्यास ४० ते ५० कोटी रुपये जमा होऊ शकतात. उर्वरित रक्कम अन्य मार्गाने जमा करता येईल, अशा सूचना गृहमंत्री देशमुख यांनी तत्कालिन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि सहाय्यक आयुक्त संजय पाटील यांना दिल्या होत्या. वाझे यांनी ही बाब त्याच दिवशी आपल्या कानावर घातली’, असे सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. त्याचबरोबर ‘गृहमंत्र्यांचा पोलीस कामकाजातला हस्तक्षेपही वाढला होता’, असेदेखील सिंग यांनी म्हटले आहे.

वाचा :-राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

‘देशमुख यांनी ४ मार्च रोजी पोलीस उपायुक्त (अंमलबजावणी) भुजबळ आणि समाजसेवा शाखेचे सहाय्यक आयुक्त संजय पाटील यांना ज्ञानेश्वारीवर बोलावून घेतले. मात्र देशमुख यांच्यावतीने त्यांचे स्वीय सहाय्यक पालांडे यांनी भुजबळ, पाटील यांना हप्ते वसूल करण्याचा तोच ‘हिशोब’ समजावून सांगितला. त्यानंतर सहाय्यक आयुक्त पाटील आणि वाझे यांनी आपापसात चर्चा केली. ते दोघेही मला भेटण्यासाठी आले. दोघांनी गृहमंत्र्यांच्या मागणीबाबत मला सूचित केले’, असा दावा सिंग यांनी पत्रात केला आहे. तसेच ‘मुकेश अंबानी धमकी प्रकरणाचा गुंता वाढत असतानाच व्यवसायिक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी परमबीर सिंग यांच्यासह मुंबई पोलीस दलातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना वर्षा बंगल्यावर बोलावून घेतले होते. या भेटीत आपण गृहमंत्र्यांच्या गैरवर्तनाबाबत मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली होती. देशमुख यांच्या आर्थिक मागण्या, पोलीस कारभारातील वाढता हस्तक्षेप याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही माहिती दिली होती. बहुतेक बैठकांना काही मंत्री उपस्थित होते. त्यांना देशमुख यांच्या वर्तनाची पूर्वकल्पना होती’, असा दावाही सिंग यांनी केला आहे.

तसेच ‘अंबानी धमकी प्रकरणात मुंबई पोलिसांकडून, पोलीस आयुक्तांकडून गंभीर चूका झाल्या. त्या अक्षम्य आहेत. आयुक्तांची बदली ही प्रशासकीय कारणावरून करण्यात आलेली नाही, असे गृहमंत्री देशमुख यांनी माध्यमांकडे स्पष्ट केले होते. प्रत्यक्षात त्यांची आर्थिक मागणी, पोलीस कारभारातील वाढत्या हस्तक्षेपास विरोध केल्यानेच देशमुख यांनी सूड भावनेने आपली बदली केली’, असा गंभीर आरोप सिंग यांनी केला आहे. तर ‘दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा मुंबईत नोंदवा, असा हट्ट गृहमंत्री देशमुख यांनी धरला होता. मात्र ते व्यवहार्य नाही, असे मत मी मांडले. डेलकर यांनी आत्महत्या मुंबईत केली असली तरी त्यांना हे टोकाचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त करणारे प्रसंग दादरा-नगर हवेली येथे घडले आहेत. हद्दीच्या वादाबरोबर येणाऱ्या अडचणींबाबत तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतरच मी माझे मत मांडले होते. मात्र ते अव्हेरून देशमुख यांनी विधानसभेत विशेष तपास पथकाची घोषणा केली’, असा आरोपही सिंग यांनी केला आहे.

दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्यानंतर या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सुरू केला. या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर १७ मार्चला या प्रकरणात सिंग यांना मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटवण्यात आले. त्यांची बदली गृहरक्षक दलात करण्यात आली. पदावरून हटवण्यात आल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री देखमुख यांच्यावर आरोप केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button