breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

४० तासांनंतर ढिगाऱ्याखालून मृतदेहाचा शोध

मुंबई : मालाडच्या दुर्घटनेत जखमी झालेले आंबेडकरनगरमधील रहिवासी सुनील सकपाळ यांच्या २२ वर्षांच्या मुलीचा मृतदेह तब्बल ४० तासांनंतर ढिगाऱ्याखालून बुधवारी काढण्यात आला. पालिकेमध्ये पाणी सोडण्याचे काम करणाऱ्या सकपाळ यांचे एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले. कुटुंबातील चारही जण कांदिवली शताब्दी रुग्णालयात उपचार घेत आहेत. सोमवारी रात्री मालाड येथे भिंत कोसळल्यामुळे अडकलेल्या लोकांचा शोध बुधवारी रात्रीपर्यंत सुरू होता. पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेलेल्या सोनाली सकपाळ या मुलीचा मृतदेह बुधवारी संध्याकाळी ढिगाऱ्याखालून काढला.

‘रात्री पाणी भरून, जेवून आम्ही झोपलो. एका बाजूला माझी मुलगी, मुलगा आणि दुसऱ्या बाजूला मी आणि माझी बायको झोपलो होतो. अचानक मोठा आवाज आला, म्हणून काय झाले बघायला घराबाहेर पडणार इतक्यात जोरात पाण्याचा लोंढा आला आणि आम्ही चारही दिशांनी कुठे गेलो काहीच आठवत नाही. मला जाग आली तेव्हा कमरेभर चिखलाखाली मी अडकलेलो होतो. मला बाहेर काढण्यासाठी तिथले लोक बाहेर खेचत होते. पण मी चिखलात असा अडकलो होतो की बाहेर ओढून काढले तर पायाने अधूच होईन, असे वाटत होते. भीतीने मी मला खेचू नका, असा ओरडत होतो. मग त्यांनी हळूहळू माझ्या आजूबाजूचा चिखल बाजूला करून बाहेर काढले,’ असे सांगताना मरणाच्या दारातून परतलेल्या सुनील यांच्या डोळ्यात एकीकडे सुटकेचा निश्वास दिसत होता. परंतु दुसरीकडे आपली मुलगी या जगात नाही या धक्क्यातूनही ते सावरण्याचा प्रयत्न करत होते.

सुनील यांच्यासह पत्नी सुनीता आणि २० वर्षांचा मुलगा यांच्या हातापायाला दुखापत झाल्याने शताब्दी रुग्णालयात दाखल आहेत. ‘मुलगी गेल्याचे फक्त मलाच माहीत आहे. सुनीता महिला विभागामध्ये आहे. परंतु तिला जाऊन हे सांगण्याची माझी हिंमतच नाही. मुलालाही अजून काही सांगितलेले नाही,’ असे सांगताना सुनील यांचा आवाज जड झाला होता.

दहावी शिकलेली त्यांची मुलगी एका छोटय़ा कंपनीमध्ये काम करत होती. सगळ्यांमध्ये मिळून मिसळून वागणारी पोर आता मला कधीच हसता खेळताना दिसणार नाही, यावर विश्वासच बसत नाही, असे सुनील आपल्यासमोरच्या खाटेवरच असलेल्या मुलाकडे बघून सांगतात.

सोमवारी रात्री घटना घडल्यानंतर मंगळवारी जेसीबीच्या मदतीने चिखल बाजूला करून लोकांना बाहेर काढायला हवे होते. मात्र जवान हाताने लाकडे आणि पत्रे बाजूला करत असल्याने बराच वेळ गेला. शेवटी बुधवारी जेसीबी आणल्यानंतर तीन मृतदेह बाहेर काढले आहेत. मंगळवारीच हे काम केले असते तर कदाचित यातील काही जणांना वाचविता आले असते, असे आंबेडकरनगरचे रहिवासी बयकर यांनी व्यक्त केले.

आता जाणार कुठे?

सुनील यांची मुलगी दहावी झाल्यानंतर तिला शिकण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे एका छोटय़ा कंपनीत कामाला जात होती. मी कष्टाने उभा केलेला संसार एका रात्रीत होत्याचा नव्हता झाला. अंगावरच्या कपडय़ाशिवाय काहीच उरलेले नाही. माझी मुलगी तर परत येणार नाही, परंतु मागे राहिलेल्या माझी पत्नी आणि मुलगा यांना आता कुठे घेऊन जाऊ, याचे उत्तर सुनील यांच्याकडे नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button