breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

१२ मे जागतिक परिचारिका दिन… मी सिस्टर सविता निगडे बोलतेय…! वाचा परिचारिकांचा भावनिक आवाज!

पिंपरी ।महाईन्यूज । प्रतिनिधी

मातृदिन (दि.१०) आणि जागतिक परिचारिका दिन १२ मे च्या निमित्ताने पिंपरी-चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील परिचारिका सविता निगडे यांनी नागरिकांना भावनिक आवाहन केले आहे.

वाचा त्यांच्याच शब्दांत…

मी सिस्टर सविता निगडे, २८ वर्षा पासून वाय. सी. एम हॉस्पिटल, पि. चि. मनपा येथे कार्यरत आहे.

सर्वांना १० मे मातृदिन व १२ मे जागतिक परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.💐

अहोरात्र रुग्णसेवेचे व्रत हाती घेतलेल्या व आधुनिक परिचर्या व्यवसायाच्या जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा हा जन्म दिवस. सण २०२० हे त्यांचे द्विशताब्दी वर्षे जागतिक आरोग्य संघटनेने परीचारिकांचे वर्षे म्हणून घोषित केले आहे.

आम्ही परिचारिका सतत जीवन आणि मरण या दोन्ही टोकांशी लढा देत असतो. एकीकडे सुखरूप प्रसूती करून छानसे बाळ मातेच्या हातात द्यायचं, तर दुसरीकडे मयत रुग्णाचे प्रेत त्याच्या नातेवाईकांच्या हातात द्यायचं,

अशा भावनिक प्रसंगात आम्ही परिचारिका काम करीत असतो.

परिचारिका आपला घरसंसार, मुलेबाळे, वैयक्तीक व सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळून ३ शिफ्ट मध्ये रुग्णसेवा करत असतात. बाहेरचे जग जेव्हा सणवार, समारंभ साजरे करत असतात तेव्हा परिचारिका ड्युटी वर रुग्णसेवेत मग्न असतात. आम्हाला कामाचे मोल मिळतेच पण रुग्ण जेव्हा बरा होऊन घरी जातो, तेव्हा रुग्णाच्या व त्याच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावरील हास्य व समाधान आम्हा परिचारिकांसाठी अनमोल असते.

सध्या भारतभर नव्हे तर जगभर कोरोना / COVID कोवीड १९ या विषाणूच्या जागतिक महामारीने ( पॅनडेमीक ) हाहाकार माजविला आहे. मानवी आरोग्याला व जीविताला धोका निर्माण झाला आहे.

          जगभरातील सर्व डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, आरोग्य कर्मचारी, पोलीस तसेच सर्व आत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कोरोना आजाराविरुद्धच्या लढाईमध्ये आपल्या प्राणांची बाजी लावून, स्वतःचा जीव धोक्यात घालून, कर्तव्य, जाबाबदारीबरोबरच सामाजिक बांधिलकी म्हणून अहोरात्र, अथकपणे, न घाबरता वैद्यकीय उपचार, मानसिक आधार देऊन रुग्णसेवा करत आहेत. यामुळे रुग्णांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन रुग्ण लवकर बरे होऊन  सुखरूप घरी जात आहेत.

              लॉकडाऊन मुले सर्व देशवासीय आपआपल्या कुटुंबासोबत घरी असताना आम्ही मात्र कर्तव्य भावनेने कुटुंबीय, लहान बाळे, नातलगांपासून दूर राहून सेवाभाव जपत आहोत.

            यामध्ये आमच्यातील काहींना जीव देखील गमवावा लागला, तर काहींना कोरोना आजाराचा प्रादुर्भाव झाला. तरीही न घाबरता कोरोनाचा प्रसार, प्रादुर्भाव थांबविण्यासाठी  आम्ही एखाद्या रुगणाचा कोरोनाचा Report positive आल्यास त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे, त्यांना रुग्णालयात आणून त्यांची तपासणी करणे व Report नुसार रुग्णपरत्वे औषधोपचार करणे, विलागीकरण सल्ला देणे इत्यादी कामे डॉक्टर, परिचारिका, नर्सेस अहोरात्र अथकपणे करत असतात.

           आम्ही घरसंसार व रुग्णसेवा अशी दुहेरी भूमिका साकारत असताना आपल्यामुळे आपल्या कुटुंबाला तसेच इतरांना या आजाराचा संसर्ग होऊ नये म्हणून अतिशय काळजी, खबरदारी घेतो.

        कोरोनाला हारविण्यासाठी आमची लढाई चालूच राहणार आहे. पण हे काम आपल्या सहकार्याशिवाय होऊच शकत नाही. या साठी सर्व देशवासियांना हात जोडून नम्र विनंती आहे की,

          १. ” घरी राहा, सुरक्षित राहा.”

          २. ” फेसमास्क/ रुमालाचा वापर करा.”

          ३.”शास्त्रोक्त पद्धतीने वारंवार हात साबणाने स्वच्छ धुवा.”

          ४.” सोशल डिस्टन्स पाळा.”

          ५.” सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.”

          ६.”समतोल आहार घ्यावा.”

          ७.” घरातच व्यायाम, प्राणायाम, योगासने करा.”

    अशी जीवनशैली आपण इथूनपुढे प्रामाणिकपणे व नियमितपणे कायमस्वरूपी  अवलंबूया म्हणजे कोरोनाबरोबरच इतरही संसर्ग जन्य आजारांपासून आपला बचाव होईल.

     तसेच, स्वतःच स्वतःचे रक्षक व्हा,

आजाराची चिन्हे लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आजार लपवू नका. आपला लढा कोरोना अजाराविरुद्ध आहे, कोरोना बाधितांविरुद्ध नाही. प्रामाणिकपणे स्वतःची, कुटुंबाची, समाजाची काळजी घ्या: म्हणजे भारत लवकरच कोरोनामुक्त होईल.

कोरोनाच्या लढ्यात प्राणांची बाजी लावून लढणाऱ्या परिचारिकांच्या शासनाकडून काही अपेक्षा आहेत.

१. अत्यावश्यक सेवा सोडून इतरांना लॉकडाऊन मुळे इतरांना सुट्या होत्या तरीही पगाराचे धोरण ठरविताना शासनाने याचा विचार केला नाही. सरसकट सर्वांसाठी एकच निर्णय घेतला गेला. सुट्ट्या न घेता अविरतपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हा अन्याय झाला आहे तो लवकर दूर व्हावा.

२. परिचर्या व्यवसायासाठी बेसिक शैक्षणिक पात्रता व कामाचे स्वरूप, रुग्णसेवा सगळीकडे सारखीच असतानाही केंद्र सरकार व राज्यसरकारी परिचारिकांच्या वेतनात व भत्यांमध्ये बरीच तफावत आहे ही तफावत दूर व्हावी .

३. जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिल्याप्रमाणे रुग्णसंख्येच्या प्रमाणात परिचारिकांचे प्रमाण ठेवावे.

४. डॉक्टर, नर्सेस, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ड्युटीवर असताना सुरक्षितता पाहिजेल, तसेच त्यांना मारहाण, शिवीगाळ करणाऱ्यांवर कायद्याचा वचक पाहिजे.

५. मानधानावरील नर्सेसना देखील समान काम – समान वेतनश्रेणी मिळायला हवी.

६. परिचारिकांची मानधनाऐवजी कायमस्वरूपी नियमित वेतनश्रेणीमध्ये भरती व्हावी. 

७. कोरोनासारख्या पॅनडेमीक मध्ये काम करणाऱ्या नर्सेसना जोखीम भत्ता, प्रोत्साहन भत्ता मिळायला पाहिजे.

८. परिचारिकांच्या निरपेक्ष रुग्णसेवेचे नोंद जागतिक पातळीवर घ्यायला पाहिजे जास्तीत जास्त परिचारिकांना पुरस्कारीत करून प्रोत्साहन द्यायला पाहिजे त्यांचा सन्मान वाढविला पाहिजे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button