breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

होर्डिंगच्या वाढीव खर्चावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

  • सत्ताधारी म्हणतात, विरोधकांचे आरोप बिनबुडाचे
  • विरोधक म्हणतात, आमदारांच्या नावाखाली भाजपचे चुकीचे उद्योग

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांच्या ऐनवेळी उपसूचना घुसडून “मलिदा” लाटण्यात भाजपच्या पदाधिका-यांचा हात असल्याचा आरोप झाल्यानंतर यामध्ये भाजपच्या कोणत्याही नेत्याचा अथवा पदाधिका-याचा सहभाग नसून हा प्रशासनाचा ठराव असल्याचा खुलासा शहर भाजपने केला आहे. तथापि, भाजपचा अनमोल प्रवक्ता आमदारांचे नाव वापरून चुकीची कामे करत असल्याचा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे. आता शहानिशा केल्यानंतर या आरोपाचे दुध का दुध-पाणी का पाणी होणार की सत्ताधारी-विरोधक तेरी भी चूप-मेरी भी चूप म्हणून यावर पडदा टाकणार, हे लवकरच समोर येणार आहे.

शहरातील अनधिकृत होर्डिंग हटविण्याबाबत महापालिका न्यायालयाच्या निर्देशानुसार धोरण राबवित आहे. होर्डिंग हटविण्यासाठी महापालिका प्रशासनाने रितसर कायदेशीर बाबींची पुर्तता करून निविदा प्रक्रिया राबवून त्याचा ठेका दिलेला आहे. यात सत्ताधारी म्हणून भाजपाचा कोणताही हस्तक्षेप नाही. भाजपाच्या कोणत्याही पदाधिका-याचा होर्डिंग हटविण्याच्या ठेक्याशी कोणताही संबंध नाही. मात्र, विरोधासाठी कोणताही मुद्दा नसल्याने विरोधकांकडून होर्डिंग हटविण्याच्या विषयाचे राजकारण करण्यात येत आहे. बिनबुडाचे आरोप करून शहरवासीयांचे लक्ष विचलीत करण्याचा विरोधकांचा हा अयशस्वी प्रयत्न आहे, असे भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी यांनी “जी-मेल”द्वारे प्रसिध्दीसाठी पाठविलेल्या मजकुरात नमूद केले आहे.

मजकुरात पुढे नमूद केले आहे की, महापालिका प्रशासन खबरदारीची उपाययोजना म्हणून अनधिकृत होर्डिंग हटवित आहे. त्यामुळे अशा अनधिकृत होर्डिंगवाल्यांचे धाबे दणाणले आहे. अशा होर्डिंगवाल्यांची आणि फुकट्या जाहिरातदारांची दुकानदारी बंद झाल्याने त्यांच्याकडून काहूर माजविण्यात येत आहे. विरोधकांशी हातमिळवणी करून भाजपाविरोधात चुकीचा प्रचार करण्यात येत आहे. त्यासाठी बेछुट आणि बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहेत, असा आरोप करण्यात आला आहे.

तथापि, भाजपच्या आरोपाचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी खंडण केले आहे. ऐनवेळी उपसूचना घुसडून कोट्यवधी रुपयांचा मलिदा लाटणा-यांचा खरा चेहरा समोर येणार आहे. त्याबाबतची सर्व माहिती संबंधित विभागाकडून मागविली आहे. माहिती प्राप्त होताच संबंधिताचे नावही समोर येणार आहे. उगीच जळफळाट करून घेण्याचे कारण नाही, भाजपचा अनमोल प्रवक्ता स्वतःला यामध्ये का गोवून घेत आहे. तो तर आमदारांच्या परस्पर त्यांचे नाव वापरून खोटे उद्योग करत असल्याचा ही आरोप साने यांनी केला आहे. त्यामुळे भाजप-विरोधक यांच्यात चांगलाच वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही पक्षाच्या पदाधिका-यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. या प्रकरणाचे दुध का दुध – पाणी का पाणी होते की, अखेर तेरी भी चूप-मेरी भी चूप म्हणून यावर पडदा टाकला जाणार, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष वेधले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button