breaking-newsमहाराष्ट्र

हे दळभद्री सरकार बदला, तरच जनतेचे प्रश्न सुटतील – खासदार अशोक चव्हाण

मुंबई :  भाजप शिवसेना सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे लोकांचे जगणे महाग आणि मरणं स्वस्त झाले आहे. भाजप सरकारने दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. हे दळभद्री सरकार घालवून काँग्रेसचे सरकार आणल्याशिवाय जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली.

काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेच्या दुस-या टप्प्याच्या दुस-या दिवसाची सुरुवात सकाळी जळगाव येथे विविध क्षेत्रातील मान्यवर व विचारवंतांशी संवाद साधला. त्यानंतर जनसंघर्ष यात्रा एरंडोलच्या दिशेने निघाली. रस्त्यात गावोगावी नागरिकांनी जनसंघर्ष यात्रेचे उस्फूर्त स्वागत केले. त्यानंतर एरंडोल येथे विशाल जनसंघर्ष सभा झाली. यावेळी जळगावच्या चोपडा तालुक्यातील कर्जमाफीचा लाभ न मिळालेले दौलतराव सोळुंखे हे ९० वर्ष वयाचे शेतकरी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना भेटून आपली व्यथा सांगण्यासाठी आले होते. प्रदेशाध्यक्षांनी त्यांना मंचावर आपल्या शेजारी बसवून आस्थेने त्यांची व्यथा ऐकली व त्यांना धीर दिला. त्यानंतर या सभेला मार्गदर्शन करताना खा. अशोक चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांचा खरपूर समाचार घेतला. ते म्हणाले की, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जनता निराश झाली आहे. राज्यात सोळा हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. आघाडी सरकारच्या काळात शेतकरी अडचणीत आले तेव्हा आपण कर्जमाफीचा निर्णय घेतला व अवघ्या चोवीस तासांत शेतक-यांची कर्ज माफ केली. फडणवीस सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेऊन दीड वर्ष झाले. अद्याप बहुतांश शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. शेतीमालाला हमीभाव नाही. पीक कर्ज मिळत नाही. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. सर्वसामान्य जनतेची लूट करून कमावलेला पैसा भाजपवाले निवडणुकीत वापरून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करित आहेत पण आता जनसंघर्षापुढे भाजपचा पैसा चालणार नाही केंद्रात आणि राज्यात परिवर्तन निश्चित आहे.

काँग्रेस सरकारने दलित, मागासवर्गीयांना आरक्षण दिले. मात्र भाजपच्या सत्ताकाळात दलित, आदिवासी, अल्पसंख्यांकावर मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरु आहेत. त्यामुळे आता त्यांना आरक्षणासोबत संरक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे. राजकीय फायद्यासाठी भाजप जाती जातीत भांडणे लावत असून सत्तेची मस्ती आल्याने भाजपचे नेते सैनिकांच्या पत्नी आणि आमच्या माता भगिंनीबाबत बेताल वक्तव्ये करित आहेत. भाजपचा खोटारडा व भ्रष्ट चेहरा आता जनतेसमोर आला असून जनता यांची मस्ती उतरून जमिनीवर आपटल्याशिवाय राहणार नाही असे खा. चव्हाण म्हणाले.

या सभेला मार्गदर्शन करताना माजी मंत्री व काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य बाळासाहेब थोरात म्हणाले की, सरकारने शेतक-यांची तूर, सोयाबीन खरेदी केले पण एक वर्ष उलटून गेले तरी त्याचे पैसे दिले नाहीत. बोंडअळी गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई दिली नाही. मुख्यमंत्री घोषणा करण्यापलिकडे काही करत नाहीत. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशी परिस्थिती आहे.माजी मंत्री नसीम खान, विधानपरिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आ. शरद रणपिसे यांनीही या सभेला मार्गदर्शन करताना सरकारवर जोरदार टीका केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button