breaking-newsराष्ट्रिय

“हिंदू, ख्रिश्चनांचा डीएनए एकसमान”

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोव्यातील माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी आपण कधीही ख्रिश्चनविरोधी नव्हतो आणि हिंदू व ख्रिश्चनांचा डीएनए एकच असल्याचे उद्गार काढले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये असतानाच्या तुलनेत ख्रिश्चनांच्या संदर्भातली वेलिंगकरांची भूमिका मवाळ झाल्याचे मानण्यात येत आहे.

“मी कॉन्वेंट शाळांच्या विरोधात असल्याच्या खोट्या अफवा पसरवण्यात येत आहेत. मी ख्रिश्चनांच्या विरोधात कधीही नव्हतो. हिंदू व ख्रिश्चन दोघांचाही डीएनए एकसमान आहे. हिंदू, मुस्लीम व ख्रिश्चन असा भेदभाव मी कधीही केलेला नाही. सगळे समान आहेत, आणि सगळ्यांना एकसमान न्याय मिळायला हवा. मी ख्रिश्चन बांधवांशी संपर्क साधीन आणि त्यांच्या मनात काही गैरसमज असतील तर दूर करीन,” वेलिंगकरांनी सांगितले.

अनेक दशकं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम केल्यानंतर गोव्याच्या प्रमुखपदावर असलेल्या वेलिंगकरांनी 2016 मध्ये संघाला सोडचिठ्ठी दिली. चर्चशी संबंधित कॉन्वेंट शाळांना अनुदान सुरू ठेवण्याचा निर्णय मनोहर पर्रीकर यांच्या भाजपा सरकारनं घेतला. या शाळांनी सूचनांचं माध्यम कोकणीवरून बदलून इंग्रजी केलं. या निर्णयास वेलिंगकरांचा विरोध होता. या मतभेदांचं पर्यवसान वेलिंगकरांनी संघ सोडण्यात झालं. अल्पसंख्याकांचं लांगुलचालन करण्याचं पर्रीकरांचं हे धोरण असल्याचं काही काळापूर्वी वेलिंगकरांनी म्हटलं होतं..

वेलिंगकरांनी गोवा सुरक्षा मंच या पक्षात नुकताच प्रवेश केला असून राजकारणात सक्रीय होण्याचे संकेत दिले आहेत. गोवा सुरक्षा मंचाच्या कार्यकर्त्यांना रविवारी वेलिंगकरांनी मार्गदर्शन केले. भ्रष्टाचार निपटण्याचं आश्वासन मनोहर पर्रीकरांनी निवडणुकीपूर्वी दिलं होतं. मात्र, लोकायुक्तांकडे भ्रष्टाचाराचे पुरावे असूनही भ्रष्ट राजकीय नेत्यांवर पर्रीकरांनी कारवाई केली नसल्याचा आरोप वेलिंगकरांनी केला आहे. दहा महिने लोकायुक्तांचा अहवाल पर्रीकरांनी दडपून ठेवला असून राजकारण्यांच्या संपत्तीची चौकशी व्हायला हवी तसेच त्यांच्यावर प्राप्तीकर विभागाचे छापे पडायला हवेत अशी मागणी त्यांनी केली आहे. मांद्रेम इथल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत वेलिंगकर गोवा सुरक्षा मंचाच्या तिकिटावर उतरतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button