breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून काँग्रेस नेत्याला अटक

काँग्रेसचे नेते पंकज पुनिया यांना कर्नालमध्ये अटक करण्यात आली आहे. सोशल नेटवर्किंगवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पुनिया यांना हरियाणा पोलिसांनी अटक केली आहे. पुनिया यांना उद्या (शुक्रवारी) न्यायलयासमोर हजर करण्यात येणार आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआयने दिलं आहे. पुनिया यांनी काही दिवसांपूर्वी स्थलांतरित कामगारांच्या मुद्द्यावरुन केलेल्या ट्विटमध्ये आक्षेपार्ह भाषा वापरली होती. यानंतर सोशल मिडियावर टीका झाल्यावर त्यांनी वादग्रस्त ट्विट डिलीट केलं होतं. मात्र याच प्रकरणात लेखी तक्रार केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

हरियाणा प्रदेश काँग्रेसचे माजी सचिव असणाऱ्या पुनियांविरोधात बुधवारी एका व्यक्तीने मधुबन पोलीस स्थानकामध्ये लेखी तक्रार केली होती. पुनिया यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखवण्याबरोबरच धर्माच्या आधारावर दोन गटांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारदाराने आपल्या तक्रारीमध्ये केला आहे.

उत्तर प्रदेशमध्येही गुन्हा दाखल

उत्तर प्रदेश सरकारनेही पुनियांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. धार्मिक भावाना दुखावणे तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातून तणाव निर्माण करण्याचा गुन्हा पुनियांविरोधात दाखल करण्यात आला आहे. पुनिया यांच्याविरोधात हजरतगंज पोलीस स्थानकामध्ये एफआयआर दाखल करण्यात आल्याचे ‘टाइम्स नाऊ’ने म्हटलं आहे.

पीटीआयला उत्तर प्रदेश सायबर सेलशी संबंधित पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पुनियांविरोधात दोन गटांमध्ये तणाव निर्माण करणे (कलम १५३ अ), धार्मिक भावना दुखावणे (२९५ अ),  सार्वजनिक पद्धतीचा गैरव्यवहार (५०५-२) आणि २००८ च्या सुधारित माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर सेलचे उपनिरीक्षक सुरेश गिरी यांनीच एफआयआर दाखल करुन घेतली आहे. “सोशल मिडिया मॉनिटरिंगदरम्यान आम्हाला या नेत्याचे ट्विट अढळून आले. या ट्विटमध्ये एका विशिष्ट गटाचा आणि देवाचा उल्लेख करण्यात आला होता. यावरुन राजकीय किंवा धार्मिक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे,” असं गिरी यांनी सांगितलं.

तक्रारीमध्ये काय म्हटलं आहे

“आरोपीने केवळ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्र्यांविरोधात अपमानास्पद आणि बदनामीकारक भाषा वापरली नाही तर त्याने मुद्दाम हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील अशी भाषा वापरली. या माध्यमातून दोन वेगळ्या धार्मिक गटांमध्ये वैराग्य, वैर, द्वेष आणि वाईट मत निर्माण होण्यासाठी प्रोत्साहन दिलं. तसेच सामाजातील शांतता भंग करुन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या,” असं तक्रारीमध्ये नमूद करण्यात आल्याचं रिपब्लिक टीव्हीने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.

ट्विटमध्ये नक्की होतं तरी काय?

पुनिया यांनी मंगळवारी केलेल्या एका ट्विटमध्ये उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर टीका केली होती. स्थलांतरित मजुरांसाठी करण्यात आलेल्या बसच्या नियोजनावरुन पुनिया यांनी ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये त्यांनी भगवान रामाचा आणि संघ परिवाराचा उल्लेख केला होता. त्यामुळे सोशल नेटवर्किंगवर त्यांच्याविरोधात अनेकांनी संताप व्यक्त केला होता. इतक्या खालच्या थराला जाऊन टीका करणे एवढ्या मोठ्या नेत्याला शोभण्यासारखे नाही असं मत अनेकांनी व्यक्त केलं होतं. सोशल नेटवर्किंगवर विरोध झाल्यानंतर पुनिया यांनी ट्विट डिलीट केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button