breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्मार्ट सिटीतून पिंपळे साैदागर, पिंपळे गुरवचा चेहरा-मोहरा बदलणार

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीने आधुनिक पद्धतीने कामकाज करण्यासाठी जीआयएस मॅपिंग, एरिया बेस डेव्लपमेंट (एबीडी) अंतर्गत पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव या परिसरातील रस्ते, आधुनिक पद्धतीने पदपथ, अत्याधुनिक सोयी-सुविधा युक्त स्वच्छतागृह करण्याच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला (डीपीआर) मान्यता देण्यात आली. तसेच आजपर्यंत झालेल्या सर्व खर्चाला मान्यता देण्यात आली.

महापालिकेतील आयुक्त दालनात पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीची सहावी बैठक आज (शुक्रवारी) पार पडली. यावेळी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव व पीसीएससीएलचे अध्यक्ष डॉ. नितीन करिर अनुउपस्थित होते. त्यामुळे महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, विरोधी पक्षनेते दत्ता साने, संचालक प्रमोद कुटे, सचिन चिखले, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमपीएमएलच्या अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे, स्मार्ट सिटीचे सहमुख्यकार्यकारी अधिकारी राजन पाटील, निळकंठ पोमण, स्मार्ट सिटीचे वित्तीय अधिकारी जितेंद्र कोळंबे, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे बैठकीला उपस्थित होते.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत 250 कोटीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये ऑप्टीकल केबल नेटवर्कसाठी 197 कोटी 18 लाख रूपये, वाय – फाय हॉट स्पॉटसाठी 16 कोटी 12 लाख रूपये, कि – ऑस्कसाठी 9 कोटी 37  लाख रूपये, व्हेरीयेबल मॅसेज डिस्पलेसाठी (व्हीएमडी) 16  कोटी 15 लाख रूपये आणि स्मार्ट पोलसाठी 11 कोटी 77  लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. ‘अर्नेस्ट अ‍ॅण्ड यंग’ या सल्लागार संस्थेने या कामाची निविदा तयार केली आहे. प्रकल्प अंमलबजावणीसाठी 14  महिने आणि देखभाल – दुरूस्तीसाठी पाच वर्षे कालावधी निश्चित करण्यात आला.

या कामाची 13  एप्रिल 2018 रोजी 250  कोटी 60 लाख रूपये अधिक जीएसटी असा खर्च अपेक्षित धरत निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. मेसर्स लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो (एल अ‍ॅण्ड टी), मेसर्स केईसी इंटरनॅशनल लिमिटेड (भारत संचार निगम लिमिटेडच्या साथीने) आणि मेसर्स अशोका बिल्डकॉन लिमिटेड (टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट इंडिया लिमिटेडच्या साथीने) या तीन कंपन्यांनी निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला होता. त्यातील मेसर्स अशोका बिल्डकॉन हा कंत्राटदार ‘कि ऑस्क’ च्या निकषात बसत नसल्याने अपात्र ठरला. तर, मेसर्स लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो आणि मेसर्स केईसी इंटरनॅशनल लिमिटेडच्या निविदा पात्र ठरल्या होत्या. त्यापैकी सर्वात कमी दराची 255 कोटी (करवगळता) आणि 300 कोटी 90 लाख रुपये (करासहित) एल अ‍ॅण्ड टी कंपनीची निविदा स्वीकारण्यात आली आहे. त्याला आज सर्वानुमते मान्यता देण्यात आली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button