breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्थायीच्या सभापती पदासाठी भाजपचे संतोष लोंढे तर राष्ट्रवादीचे पंकज भालेकर यांचा अर्ज दाखल

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपकडून संतोष लोंढे तर राष्ट्रवादीकडून पंकज भालेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपकडून लोंढे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने बहुमताच्या जोरावर स्थायीच्या सभापती पदी त्यांची निवड निश्चित मानली जाते. केवळ औपचारिकता म्हणून प्रशासनाला निवडणूक घेण्याची तसदी घ्यावी लागणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी यांचा एक वर्षाचा कार्यकाळ संपला. आगामी वर्षासाठी सभापती पदाची निवडणूक 6 मार्च रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी पक्षनेते नामदेव ढाके यांनी भाजपच्या इच्छुकांचे अर्ज मागविले होते. त्यानुसार आज संतोष लोंढे यांनी आपला अर्ज दाखल केला. तर, राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी देखील इच्छुकांचे अर्ज मागविले होते. त्यावर राष्ट्रवादीकडून पंकज भालेकर यांनी अर्ज भरला. लोंढे यांचा अर्ज दाखल करताना महापौर उषा उर्फ माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, माजी महापौर राहूल जाधव, स्थायीचे मावळते सभापती विलास मडिगेरी, उपमहापौर तुषार हिंगे, भिमाबाई फुगे आदी यावेळी उपस्थित होते.

अर्ज दाखल करण्यासाठी नगरसचिव उल्हास जगताप यांनी दुपारी तीन ते सायंकाळी पाचपर्यंत वेळ होती. दरम्यान, साडेतीनच्या सुमारास संतोष लोंढे यांचा अर्ज दाखल झाला. तर, सुमारे चारच्या सुमारास राष्ट्रवादीचे पंकज भालेकर यांचा अर्ज जमा झाला. आता 6 मार्च रोजी स्थायी समितीच्या सभागृहात निवडणूक घेतली जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल कामकाज पाहणार आहेत. बहुमताच्या जोरावर सभापतीची निवड होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button