सुभाषचंद्र बोस यांच्या नातीकडून नथुराम गोडसेच्या प्रतिमेची आरती
भोपाळ : स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांच्या नातीने महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेची आरती केल्यामुळे वादाला तोंड फुटलं आहे. बोस यांच्या पुतण्याची कन्या असलेल्या राज्यश्री चौधरी अखिल भारतीय हिंदू महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षआहेत.
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये दौलतगंज भागात असलेल्या हिंदू महासभेच्या कार्यालयात गोडसेच्या प्रतिमेची चौधरींनी पूजा केली. राणी लक्ष्मीबाई यांना जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिल्यानंतर राज्यश्री चौधरी आणि हिंदू महासभेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या निशा कटोच यांनी गोडसेची प्रार्थना केली होती.
जवाहरलाल नेहरु यांच्या सरकारमुळे गांधींजींची हत्या झाली, असा आरोप चौधरी आणि कटोच यांनी ठेवला.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी हिंदू महासभेविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश शनिवारी पोलिसांना दिले होते. राज्यात नथुराम गोडसेचं उदात्तीकरण अजिबात सहन केलं जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता.
काँग्रेस सरकार नथुराम गोडसेची विचारसरणी राज्यात फोफावू देणार नाही आणि त्याची पूजा करणाऱ्या घटकांवर कारवाई करेल, असं राज्यमंत्री गोविंद सिंह यांनी स्पष्ट केलं.