breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

सांगवीमध्ये राजकीय ‘उलथापालथ’; नवनाथ जगताप यांची राष्ट्रवादीशी जवळीकता!

  • भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांना आव्‍हान
  • राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा

पिंपरी। (अमोल शित्रे) – लोकसभा-विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्याने शहरातील राजकीय कार्यकर्त्यांच्या हालचाली वेगाने बदलू लागल्या आहेत. शहराच्या राजकारणात भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचा ‘शब्द’ प्रमाण मानला जात असतानाच त्यांच्या कुटुंबियांमध्येच फुटीचे राजकारण सुरू झाले आहे. एकेकाळी “भाऊं”चे “राईट हँड” मानले जाणारे स्थायीचे माजी सभापती नवनाथ जगताप यांची राष्ट्रवादीशी जवळीक वाढल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. निवडणुकीत जगतापांच्या विरुध्द जगताप असे बंड घडवून आणून “भाऊं”च्या राजकीय अस्तित्वाला धक्का देण्याचा राष्ट्रवादीचा हा प्रयत्न असल्याची चर्चा सांगवीत जोरात सुरू आहे.

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणावर भाजपचे आमदार लक्ष्मण “भाऊं”ची जोरात पकड आहे. “भाऊं”चा शब्द ओलांडण्याचे धारिष्ट्य कोणी सहज दाखवू शकणार नाही. त्यामुळे त्यांना शहराच्या राजकारणातले “कारभारी” मानले जाते. मागील विधानसभा आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत “भाऊं”नी राष्ट्रवादीचे राजकीय पानीपत केले. त्याचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादीचे अजित “दादा” पवार यांनी चिंचवड विधानसभा हे “टार्गेट” समोर ठेवले आहे. त्यासाठी “दादा” स्वतः शहरासाठी वेळ देऊ लागले आहेत. जगतापांसमोर आव्‍हान निर्माण करण्यासाठी धडा शिकवण्यासाठी राजकीय खेळ्या केल्या जात आहेत. त्याचाच प्रत्यय अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप यांची राष्ट्रवादीशी जवळीकता वाढल्याने पहायला मिळत आहे. “भाऊं”च्या एकहाती कारभाराला कंटाळून नवनाथ हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेणार असल्याचेही बोलले जात आहे.

नवनाथ जगताप हे अपक्ष आघाडीचे विद्यमान नगरसेवक असले तरी त्यांना “भाऊं”च्या गटाचे कट्टर समर्थक मानले जातात. कारण, मागच्या पंचवार्शिकीत “भाऊं”च्या आशिर्वादाने त्यांना स्थायीचे सभापती पद मिळाले. मुळात त्यांची राजकीय कार्यकिर्दच “भाऊं”च्या मार्गदर्शनाखाली घडली आहे. त्यांच्या शब्दापुढे जाऊन विरोधात निर्णय घेण्याचे धाडस नवनाथ कदापी दाखवू शकणार नाहीत, हे त्यांनी अनेकदा खासगीत गप्पा मारताना बोलून दाखविले आहे. परंतु, राष्ट्रवादीशी जवळीक वाढल्याने ते “भाऊ” गटावर नाराज असल्याचे दिसते. नेत्यांचा वाढदिवस असो अथवा एखादा कार्यक्रम, नवनाथ यांच्या फ्लेक्सवर “भाऊं”चा फोटो लावलेला असायचा. मात्र, नुकतेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या फ्लेक्सवरून “भाऊं”चा नामोल्लेख अथवा फोटो कालबाह्य झाला आहे. उलट राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी मोठ्या थाटात त्यांचे फ्लेक्स लावून शुभेच्छा दिल्या आहेत.

—————-

राष्ट्रवादीकडून फुटीचे राजकारण…

“भाऊं”च्या विरोधात माजी ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी शड्डू ठोकला आहे. त्यातच पुन्हा शाम जगताप यांना चिंचवड विधानसभेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी राष्ट्रवादीने दिली आहे. आता पुन्हा नवनाथ जगताप राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याने अडनावातील साधर्म्य आमदार लक्ष्मण जगताप यांना आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अडचणीचे ठरणार आहे. त्यातच राजेंद्र जगताप यांनी चिंचवड विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे. यावरून आमदार जगताप यांना घायाळ करण्यासाठी राष्ट्रवादीकडून फुटीचे राजकारण केले जात आहे की काय? असा प्रश्न आहे. आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीत जगताप कुटुंबियांची राजकीय भूमिका निर्णायक ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button