breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संकटकाळात माणूसकी सांभाळा, गोरगरींबाच्या तोंडातील घास हिरावून घेवू नका – उपमहापौर तुषार हिंगे

पिंपरी चिंचवड रेशनधान्य दुकानदारांची घेतली बैठक, युनिटप्रमाणे धान्य वाटप करण्याची सुचना

पिंपरी, – देशासह राज्यात कोरोना महामारीने हाहाकार माजला आहे. त्यामुळे अत्यावश्यक दुकाने वगळून संपुर्ण लॉकडाऊन आहे. या संकटकाळात रेशनधान्य दुकानदार गोरगरींब नागरिकांची आर्थिक पिळवणूक करु लागले आहेत. त्यांना युनिटप्रमाणे धान्य वाटप न करता जादा दराने धान्य देणे, तसेच धान्य वाटपात कपात केली जात आहे. त्यामुळे पिंपरी चिचवड शहरातील रेशनधान्य दुकानदारांना निर्वाणीचा इशारा दिला असून गोरगरींबाच्या तोंडातील घास हिरावून घेवू नका, त्यांना संकटकाळात मदत करुन युनिटप्रमाणे धान्याचे वाटप करा, अशा सुचना उपमहापौर तुषार हिंगे यांनी केल्या.

पिंपरी चिंचवड येथील अन्नधान्य वितरण अधिकारी परिमंडळ कार्यालयात सर्व रेशनधान्य दुकानदारांची बैठक घेतली. त्या बैठकीला नायब तहसिलदार दिनेश तावरे, हेमंत भोकरे, सर्व सहायक पुरवठा निरीक्षक आणि दुकानदार उपस्थित होते.

उपमहापौर तुषार हिंगे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व रेशनकार्डधारकांना (शिधापत्रिकाधारक) स्वस्त धान्य दुकानादारांमार्फत युनिटप्रमाणे धान्य पुरविण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र, दुकानदार युनिटप्रमाणे धान्य न देता आपल्या मर्जीप्रमाणे कमी धान्य वाटप करीत आहेत. त्यामुळे मोठे कुटुंब असलेल्या रेशनकार्डधारकांची गैरसोय होत आहे,

तसेच शासनाने आदेश दिल्याप्रमाणे सर्व रेशनकार्डधारकांना युनिटप्रमाणे धान्य पुरवठा करणे अत्यावश्यक आहे. मात्र, दुकानदार शासनाच्या आदेशाकडे साफ दुर्लक्ष करीत आहे. आपल्या मर्जीप्रमाणे ते धान्य वाटप करीत आहेत. ज्या रेशनकार्डधारकांच्या घरात जास्त सदस्य आहेत, त्यांना कमी धान्य मिळाल्याने त्यांची गैरसोय होत आहे. त्यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.

शहरातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना रेशनकार्डवरील युनिटप्रमाणे धान्य वाटप केले जावे. जे दुकानदार युनिटप्रमाणे धान्य वाटप करीत नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. प्रसंगी त्याचा परवाना सील करावा, अशी तक्रार पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपमहापौर तुषार हिंगे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी परिमंडळ ‘अ’ आणि ‘ज’ कार्यालयाच्या अन्नधान्य वितरण अधिकार्‍यांकडे निवेदन आहे.

… तर संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करु
पिंपरी चिंचवड शहरातील सर्व रेशनधान्य वितरण दुकानदारांनी प्रत्येक कार्ड धारकाला त्यांच्या युनिटप्रमाणे धान्याचे वाटप करावे, दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ असे त्या-त्या युनिटनूसार मालाचे वाटप करावे. तसेच अत्योदय धारकाला पाच किलो मोफत धान्य द्यावे, तसेच यापुढे एकाही दुकानदाराच्या तक्रारी येवू देवू नका. प्रत्येक नागरिकांना संकटसमयी माल व्यवस्थित द्या. नागरिकांना मालात कपात करु नका, जादा दराने मालाची विक्री केल्याचे आढळून आल्यास संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करुन त्याचे दुकान परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात येईल, अशा सुचना नायब तहसिलदार दिनेश तावरे यांनी दिल्या आहेत. तसेच दुकानदारांना काही अडचणी आल्यास त्यांनी आपआपल्या परिसरातील लोकप्रतिनिधी अथवा माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button