breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

शेतकऱ्यांनी कृषिपंपांचे वीजबिल भरलेच पाहिजे

– शेतीला सुरळीत वीजपुरवठा करण्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन

औरंगाबाद । प्रतिपादन

कृषिपंपांची वीजबिले भरण्यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांना दोन-तृतीयांश एवढी भरघोस सवलत दिली आहे. वीजबिलाची वसूल झालेली रक्कम त्या-त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विद्युत वितरण यंत्रणा सक्षम करण्यासाठी वापरली जाणार आहे. अडचणीत आलेल्या महावितरणला टिकवायचे असेल तर शेतकऱ्यांनी वीजबिले भरलीच पाहिजेत, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

औरंगाबाद येथे जिल्हा वार्षिक योजनेच्या ‍प्रारूप आराखडा विभागीय बैठकीनंतर विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री पवार बोलत होते.

मंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यात कृषी पंपधारकांकडे 45 हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी राज्य शासनाने 15 हजार कोटी रुपयांचे व्याज व दंड माफ केला जाणार आहे. उरलेल्या 30 हजार कोटींपैकी 15 हजार कोटींच्या बिलाचा भार राज्य सरकारने उचलला आहे. मराठवाड्यात 10 हजार कोटींपैकी 5 हजार कोटींच्या वीजबिलाचा भार राज्य सरकारने उचलला आहे. आता राहिलेले राज्याचे 15 हजार कोटींचे वीजबिल आणि मराठवाड्याचे 5 हजार कोटींचे वीजबिल टप्प्याटप्प्याने आता शेतकऱ्यांनी तातडीने भरले पाहिजे. शेतकऱ्यांची अडचण आहे याची आम्हाला कल्पना आहे म्हणूनच आम्ही शेतकऱ्यांना काही काळापूर्वी कर्जमुक्ती दिली. पाऊसकाळ बरा झालेला आहे. पिके चांगली आलेली आहेत. अशात शेवटी महावितरण कंपनीही टिकली पाहिजे. वीजबिलाच्या वसुलीतून जे पैसे जमा होणार आहेत, ते त्या-त्या गावात आणि त्याच जिल्ह्यातल्या विद्युत वितरण यंत्रणेच्या पायाभूत विकासासाठीच महावितरणच्या माध्यमातून खर्च करणार आहोत, हे आम्हाला राज्यातील जनतेला आणि शेतकऱ्यांना आवर्जून सांगायचं आहे. जिथे काही ट्रान्सफॉर्मर लागणार असतील, जिथे काही सबस्टेशन उभे करावे लागणार असतील, जे काही महावितरणचे काम असेल, त्यासाठी तो पैसा खर्च होणार आहे. त्याच्यातून त्याच भागातल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.

आजपण काही मुद्दे याबद्दल आमच्या सहकारी मंत्र्यांनी निदर्शनास आणून दिले आहेत. त्याच्याबद्दल राज्य स्तरावर आम्ही चर्चा करू. काही व्यवहारी मार्ग काढता येतो का, ते तपासू. पण कृषिपंपांचे वीजबिल आता भरले पाहिजे. एकूण बिलाच्या एक-तृतीयांश वीजबिल दिलेले आहे तर दोन-तृतीयांश बिलातील सवलत दिली आहे. यातून आलेले पैसेही त्या-त्या जिल्ह्यातच खर्च होणार आहेत. सर्व मा.खासदार, मा.आमदार तसेच लोकप्रतिनिधींनीही जनतेला व शेतकऱ्यांना कृषिपंपांचे वीजबिल भरण्याची विनंती करावी. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कृषिपंपांच्या वीजबिल वसुलीसाठी प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आलेले असून, विभागीय आयुक्तांनाही यात लक्ष घालण्यास सांगण्यात आले आहे. तरी शेतकऱ्यांनी वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button