breaking-newsUncategorizedआंतरराष्टीय

शेजारधर्माला प्राधान्य हेच भारताचे धोरण!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मालदीव भेटीत ‘शेजारधर्माला प्राधान्य’ देण्याच्या आपल्या धोरणानुसार मालदीवशी सहा द्विपक्षीय करार केले. त्याच वेळी मालदीव संसदेतील भाषणात पाकिस्तानचे नाव टाळून, एका देशाने पुरस्कृत केलेल्या दहशतवादाचा मानवतेला सर्वात मोठा धोका असल्याचे निदर्शनास आणले.

एका देशाच्या पाठिंब्याने फोफावलेल्या दहशतवादाचा सध्या मानवतेला सर्वात मोठा धोका असल्याने त्याचा मुकाबला करण्यासाठी सर्वानी एकत्र यावे, असे आवाहन मोदी यांनी जगातील नेत्यांना केले. मालदीवच्या संसदेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध इतिहासाहूनही जुने आहेत. मालदीवमधील लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक भारतीय तुमच्यासोबत आहे.  पंतप्रधानपदी फेरनिवड झाल्यानंतर मोदी यांनी आपला पहिलाच परदेश दौरा मालदीव या शेजारी राष्ट्रात केला. मालदीवची राजधानी माले येथे मोदी यांचे शनिवारी संध्याकाळी आगमन झाले. विमानतळावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदी आणि मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोली यांच्यात शनिवारी व्यापक चर्चा होऊन दोन्ही देशांनी संरक्षण आणि सागरी सुरक्षा यासह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमधील द्विपक्षीय संबंध बळकटकरण्यासाठी सहा करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.

दहशतवादाचा एखाद्या देशालाच धोका नाही तर संपूर्ण संस्कृतीलाच धोका आहे, चांगले दहशतवादी आणि वाईट दहशतवादी असे वर्गीकरण लोक अद्यापही करीत आहेत ही दुर्दैवाची बाब आहे, असेही मोदी म्हणाले.

पाकिस्तानच्या भूमीतील दहशतवादी संघटनांना पाठिंबा देणे त्या देशाने थांबवावे, असेही पाकिस्तानला बजावण्यात आले आहे. परंतु आता डोक्यावरून पाणी गेले आहे. त्यामुळे जगातील नेत्यांनी दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन मोदी यांनी केले.

भारत-मालदीव करार

भारत आणि मालदीवमध्ये फेरीबोट सेवा सुरू करण्याबाबतच्या सामंजस्य करारावर शनिवारी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. पंतप्रधान मोदी आणि मालदीवचे अध्यक्ष मोहमद सोलीह यांच्यात दोन देशांमधील दळणवळण वाढीला महत्त्व देण्यावर एकमत झाले. याशिवाय, जलमापन विज्ञानाच्या क्षेत्रातील सहकार्य, आरोग्य क्षेत्र, सागरी प्रवासी आणि मालवाहतूक, भारताचे प्रत्यक्ष कर मंडळ, सीमा शुल्क विभाग आणि मालदीवची कस्टम्स सव्‍‌र्हिस यांच्यात सीमाशुल्क क्षमता निर्मितीतील सहकार्य करार करण्यात आले. तसेच मालदीवच्या सनदी सेवा अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आणि क्षमता निर्मिती कार्यक्रम, राष्ट्रीय सुशासन केंद्र, प्रशासकीय सुधारणा आणि मालदीव सव्‍‌र्हिस कमिशन यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्याही करण्यात आल्या. भारतीय नौदल आणि मालदीवचे नॅशनल डिफेन्स फोर्स यांच्यात गैरलष्करी व्यावसायिक जहाजांच्या वाहतुकीच्या माहितीची देवाणघेवाण करण्याबाबतही तांत्रिक करार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अध्यक्ष सोली यांच्यात सौहार्दपूर्ण चर्चा झाली, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी सांगितले. दोन्ही नेत्यांनी किनारी टेहळणी रडार यंत्रणा आणि मालदीवच्या सैन्यासाठी संयुक्त प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटनही केले.

सबका साथ, सबका विश्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीव भेटीतही सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास अशी घोषणा देऊन मालदीव या मुस्लीम बहुल देशाशी आपले संबंध किती दृढ आणि महत्त्वाचे आहेत, हे दाखवून दिले. शेजारधर्माला प्राधान्य हे आपल्या सरकारचे धोरण असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मोदी यांना मालदीवचा सर्वोच्च किताब

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘रुल ऑफ निशान इझ्झुद्दीन’ हा मालदीवचा सर्वोच्च किताब मालदीवचे अध्यक्ष इब्राहीम मोहम्मद सोलीह यांच्या हस्ते शनिवारी प्रदान करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button