शेगावचे गजानन महाराज मंदिर सुरू करण्यासाठी मूक आंदोलन
बुलढाणा – गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे देशभरातील मंदिरे बंद आहेत. परंतु काही मंदिरे कोरोनासंदर्भातील अटींचे पालन करत उघडली आहेत. त्याच धर्तीवर जिल्ह्यातील शेगावचे प्रसिद्ध श्री गजानन महाराज मंदिर उघडण्यात यावे या मागणीसाठी आज हॉटेल ओनर्स असोसिएशन आणि व्यापाऱ्यांनी मंदिरासमोर मूक आंदोलन केले.
मंदिर बंद असल्याने शेगावमधील अर्थकारण थांबले आहे. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र देशातील वैष्णोदेवी आणि पदमनाथ मंदिर सुरू करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर शेगावचे श्री गजानन महाराज मंदिरही सुरू करण्यात यावे अशी मागणी शेगावच्या या हॉटेल व्यावसायिक आणि व्यापारी मंडळींनी केली आहे. या मागणीसाठी आज मंदिराच्या एका प्रवेशद्वारासमोर या सर्वांनी मूक आंदोलन केले. यावेळी सर्वांनी तोंडाला मास्क लावून आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत हे आंदोलन केले.