शिवाजी महाराजांवरील ‘त्या’ पोस्टविरोधात बेळगावात सकल मराठा समाजाचे आंदोलन
बेळगाव – छत्रपती शिवाजी महाराजांबाबत सोशल मीडियावर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्ट विरोधात आज रविवारी सकाळी बेळगावातील सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. बेळगावातील मार्केट पोलीस ठाण्यासमोर मराठा समाजातर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले. सोशल मीडियावर छत्रपती शिवरायांबद्धल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांविरोधात कारवाई करा अन्यथा निर्माण होणाऱ्या परिस्थितीला पोलीस प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराच मराठा समाजाच्या आंदोलकांनी दिला.
पिरणवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात संगोळी रायण्णा यांचा पुतळा उभारण्यात आल्यानंतर काही समाजकंटकांनी सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात आक्षेपार्ह लिखाण केले होते. त्यामुळे संतापलेल्या सकल मराठा समाजातील तरुणांनी आज सकाळी मार्केट पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर शहर पोलीस आयुक्त त्यागराजन यांच्या कार्यालयाकडे मोर्चा वळवला. कार्यालयासमोरील रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले. मराठा समाजाच्या आक्रमकतेमुळे अखेर आयुक्तांना कार्यालयाबाहेर येऊन निवेदन स्वीकारावे लागले. आजच्या आज आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मराठा समाजाने दिलेल्या निवेदनात केली आहे.