breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

शिवसेना-भाजपचे लक्ष्य २८८ जागा; भाजपचा नारा “अबकी बार २२० पार’

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने आपला चेहरा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पुढे केले अाहे. देवेंद्र फडणवीस ऑगस्ट महिन्यात सर्व २८८ मतदारसंघांत विकास यात्रा काढणार असून याला “फिर एक बार शिवशाही सरकार’ यात्रा असे नाव देण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांसोबत वेगवेगळ्या ठिकाणी यात्रेत मंत्रिमंडळातील शिवसेना-भाजपचे मंत्रीही सहभागी होणार आहेत. एकीकडे युती होणारच, असे म्हटले जात असले तरी भाजपकडून दगाफटका होऊ शकतो, अशी शंका शिवसेनेच्या नेत्यांना आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना दोघेही २८८ जागांवर तयारी करत आहेत. भाजपने निवडणुकीत अबकी बार २२० पार असा नारा घेतला असून त्या दृष्टीने सर्व जागांची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये साेमवारी बैठक होणार असून दाेघेही आमदारांना मार्गदर्शन करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबईत शनिवारी भाजप जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे मंत्री आणि कर्नाटकचे मंत्री रवी कुमारही उपस्थित होते. बैठकीत पुढील मुख्यमंत्री भाजपचाच असावा असा सूर अनेक पदाधिकाऱ्यांनी काढला आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजेत, असे म्हटल्याचे समजते. बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले,

प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटते की त्यांचाच मुख्यमंत्री व्हावा. भाजपच्या कार्यकर्त्यांचीही तीच भूमिका आहे. परंतु आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा आमचा प्रयत्न आहे. अध्यक्ष अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेतही दोन्ही पक्षांच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्यावर भर देण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार आम्ही काम करत आहोत. निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय अमित शहा, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस घेतील.

लोकसभेला जे ठरवले होते त्याचा आढावा बैठकीत घेण्यात आला. तसेच दुष्काळ असल्याने पक्षातर्फे काय मदत देऊ शकतो, यावरही चर्चा झाली. काही जिल्हाध्यक्षही बदलण्यात आले. लोकसभेला एक कोटी ११ लाख सदस्य आम्ही केले होते, आता आणखी २५ लाख सदस्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून सर्व शक्ती केंद्रांसाठी २० हजार विस्तारकांची नेमणूक करण्यात येणार आहे. ऑगस्ट महिन्यापासून मुख्यमंत्री सर्व २८८ मतदारसंघांत “फिर एक बार शिवशाही सरकार’ नावाने विकास यात्रा काढणार असून पाच वर्षांत सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती दिली जाणार आहे.

ऑक्टोबर महिन्यात निवडणुकीची शक्यता
विधानसभेच्या निवडणुका १५ ते २० ऑक्टोबरदरम्यान होण्याची शक्यता असून आचारसंहिता १५ सप्टेंबरच्या आसपास लागू शकते, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकांच्या तयारीला आत्तापासूनच लागण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button