breaking-newsताज्या घडामोडीपुणे

शिवनेरी विकास कामासाठी २३ कोटी रुपयांचा निधी देणार: अजित पवार

जुन्नर | महाईन्यूज | प्रतिनिधी

किल्ले शिवनेरी व परिसर विकासाकरिता २३ कोटी रुपयांचा निधी देण्याबरोबरच गडावरील शिवसंस्कार सृष्टी आणि रोप वे उभारणीची कामे मार्गी लावू, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन आवारात आयोजित शिवजयंती उत्सव कार्यक्रमात अजितदादा पवार बोलत होते.

यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, सार्वजिनक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यटन, माहिती व जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, दिलीप मोहिते, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरे, पी.डी.सी.सी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, कृषी उत्पन बाजार समितीचे सभापती संजय काळे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर उपस्थित होते.

पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण‍ विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही यासाठी जिल्हयाचा ६५० कोटी रुपयांचा वार्षिक आराखडा तयार केला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शिवनेरी परिसर विकासासाठी २३ कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात शेतकरी, सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थी यांना केंद्रस्थानी ठेवून विकास कामांचे नियोजन करण्यात येत आहे असेही अजितदादा पवार म्हणाले.

शालेय शिक्षण, अंगणवाडया, आरोग्य अशा अत्यावश्यक कामांसाठी दीड ते दोन टक्के व्याजदर आकारणाऱ्या जागतिक स्तरावरील वित्तीय संस्थाकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून अजितदादा पवार म्हणाले की, शिवनेरी किल्ल्यावर राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेले संस्कार, शिक्षण यांची माहिती सर्वांना होण्यासाठी ‘जिजाऊमाता ते शिवरायांच्या रोहिडेश्वरावरील स्वराज्याची शपथ’ या घटनाक्रमांवर आधारित शिवसंस्कार सृष्टी उभारण्यात येईल. तसेच वयस्कारांच्या सोयीसाठी रोपवे उभारण्याकरिता सर्वेक्षणासाठी निधी दिला जाईल अशी घोषणाही अजितदादा पवार यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगापुढे येण्यासाठी किल्ले संर्वधन महत्त्वाचे आहे. बॉस्टन विद्यापीठात ‘शिवाजी द मॅनेजमेंट गुरु’ अशी १०० गुणांची प्रश्नपत्रिका तर पाकिस्तानमध्ये पाठ्यपुस्तकांतून महाराजांवरील गौरवपर धड्यांचा समावेश ही शिवप्रेमींसाठी अभिमानाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई ही कुणा धर्माविरुध्द नव्हती, तर अन्यायाविरुद्ध न्यायाची लढाई होती. महाराजांचा कित्ता गिरवणे, ही आजची गरज आहे असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना जे नैतिकतेचे अधिष्ठान दिले, त्यामुळेच महाराजांच्या चरित्राचे गारुड आजही कायम आहे असे खासदार डॉ.अमोल कोल्हे म्हणाले.

वयस्कर लोकांना शिवनेरीवर येण्यासाठी रोप वे उभारण्याची व शिवनेरीवर शिवसंस्कार सृष्टी उभारण्याची मागणी खासदार डॉ.अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके यांनी केली.

कार्यक्रमात राष्ट्रपती पदक विजेते माजी सहायक पोलिस आयुक्त वसंत ताजणे यांना शिवनेर भूषण पुरस्कार तर लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक आशुतोष डुंबरे यांना छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला.

सुरुवातीला पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जुन्नर मार्केट कमिटी शाखेच्या नूतन शाखेचे व एटीएम केंद्राचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार अतुल बेनके यांनी केले. उपस्थितांचे आभार अशोक घोलप यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button