breaking-newsताज्या घडामोडीपुणे

शनिवारवाडा परवानगी अधिकार महापौरांना

  • कार्यक्रमांसाठी महापालिकेचे धोरण

  • पक्षनेत्यांचा निर्णय

पुणे – एल्गार परिषद आणि त्यानंतर भिमा कोरेगावप्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर चर्चेत आलेल्या शनिवारवाडा प्रांगणातील खासगी कार्यक्रमांवर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. मात्र, अखेर त्यावर तोडगा निघाला असून शुक्रवारी झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीत प्रांगणात कार्यक्रम घेण्यासंदर्भात धोरण ठरविण्याचे अधिकार महापौरांना देण्यात आले आहेत. दरम्यान, या धोरणात सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य देण्याबाबत चर्चा झाल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मागील वर्षी शनिवारवाडा प्रांगणात एल्गार परिषद झाली होती. यानंतर दोनच दिवसांनी भिमा कोरेगाव येथे दंगल झाली. याची बिजे एल्गार परिषदेतच रोवली गेल्याचा संशय व्यक्त करत पुणे पोलिसांनी शनिवारवाड्यासमोरील प्रांगणात कार्यक्रम आणि सभांना परवानगी देऊ नये, असे पत्र महापालिकेला दिले होते. परंतू महापौर मुक्ता टिळक यांनी खंबीर भूमिका घेत शनिवारवाड्याच्या प्रांगणात कार्यक्रम घेतले जातील, असे जाहीर केले तरी महापालिकेकडून खासगी कार्यक्रमांवर आळा आणण्यात आला होता. दरम्यान, पोलिसांच्या सूचनेनंतर पालिका प्रशासनाने कार्यक्रमांसंदर्भात पक्षनेत्यांच्या बैठकीमध्ये प्रस्ताव ठेवला होता. त्यामध्ये सर्वपक्षाच्या गटनेत्यांनी शनवारवाड्यासमोरील प्रांगणात कार्यक्रम घेण्याबाबत धोरण करण्याचे सर्वाधीकार महापौरांना दिले.

यापुढे रोख पुरस्कार नाहीत
राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांकडून पुरस्कारांवर आणि सणसमारंभांवर केली जाणारी उधळपट्टी रोखण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानंतर नियमावली तयार केली आहे. यानुसारच यापुढे कार्यक्रम होतील. हे पुरस्कार देताना यापुढे मानमात्र आणि यशोचित सत्कार करण्यात येईल. कुठलेही रोख पुरस्कार नसतील, असा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे मुक्ता टिळक यांनी स्पष्ट केले.

महापालिकेच्या नाव समितीने एखादे उद्यान, शाळा, मैदान, रस्ते, चौक अथवा महापालिकेच्या वास्तूंना नाव दिल्यास ते बदलण्यात येणार नाही. दरम्यान, यापूर्वी पाणी टाक्‍यांसाठी कोणी विनामोबदला महापालिकेला जागा उपलब्ध करून दिली असल्यास त्यांच्याकडून प्रस्ताव आल्यास संबधित जागा मालकाने सुचविलेले नाव त्या टाकीला देण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. या बैठकीला सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, मनसेचे गटनेते वसंत मोरे, माजी महापौर प्रशांत जगताप, अतिरिक्त महापालिका आयुक्त शीतल उगले उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button