breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विहिरी आणि कुपनलिकांचे अधिग्रहण केल्यास टंचाईवर मात शक्य

  • जिल्हाधिकारी यांच्यामार्फत तत्काळ कार्यवाही करावी
  • आमदार लक्ष्मण जगताप यांची मनपा आयुक्तांना सुचना

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमधील सर्व विहिरी व कूपनलिका ताब्यात घेऊन त्याचे पाणी नागरिकांना उपलब्ध करून दिल्यास पाणीटंचाईवर काही प्रमाणात मात करता येऊ शकेल. या विहिरी व कूपनलिका जिल्हाधिकारी यांच्यामार्फत अधिग्रहण करण्याची कार्यवाही करावी, अशी सूचना भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली आहे.  

यासंदर्भात आमदार जगताप यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्के भरले असले तरी शहरासाठी दहा वर्षांपूर्वी मंजूर पाणी आरक्षण आणि शहराची आजची लोकसंख्या यांमध्ये खूप मोठा फरक आहे. दहा वर्षांपूर्वी १७ लाख लोकसंख्येला मंजूर केलेल्या पाणी आरक्षणातून आज २७ लाख लोकसंख्येची तहान भागवत असताना प्रशासनाची निश्चितच दमछाक होत आहे. परिणामी शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला समान पिण्याचे पाणी मिळावे यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी हातात हात घालून एकत्रितपणे सर्व पर्यायांचा विचार करणे गरजेचे आहे. अनधिकृत नळजोडांना आळा घालून पाणीचोरी रोखण्यासोबतच इतर पर्यायी स्त्रोतांमधून नागरिकांना पाणी उपलब्ध करून देता येईल का? याचा विचार प्रशासनाने करावा. शहरातील पाणीटंचाई तीव्र होण्यापूर्वीच हा विचार होणे आवश्यक आहे.

शहराच्या वेगवेगळ्या भागात विहिरी व कूपनलिका खोदण्यात आलेल्या आहेत. त्यांची संख्या मोठी आहे. काही विहिरी व कूपनिलिका या सरकारी खर्चाने, तर काही नागरिकांनी स्वखर्चाने खोदलेल्या आहेत. या विहिरी व कूपनलिकांचे पाणी नागरिकांना उपलब्ध करून देता येणे शक्य आहे. त्यातून पाणीटंचाईवर काही प्रमाणात मात करता येणार आहे. प्रत्यक्षात या विहिरी व कूपनलिकांचे पाणी विकणारे टँकर माफिया शहरात उदयास आले आहेत. शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांना अवास्तव दराने पाणी विकून टँकर माफिया आपले उखळ पांढरे करत आहेत. सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची पाण्याच्या नावाखाली एक प्रकारे लुटच सुरू आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. शहराची सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता महापालिका प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

टंचाई तिव्र होण्यापूर्वी पाऊल उचला

महापालिकेने या विहिरी व कूपनलिका ताब्यात घेऊन त्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. तसेच त्यांची लूटही थांबेल. त्याचप्रमाणे टँकर माफियांना देखील कायमचा आळा बसेल. शहरातील पाणीटंचाई तीव्र होण्यापूर्वीच महापालिकेने विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याबाबत ठोस पावले उचलावीत. त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शहरातील सर्व विहिरी व कूपनलिका ताब्यात घ्या, पाणी लोकांना उपलब्ध करून द्या”, हे घोषवाक्य घेऊनच महापालिकेने आतापासून पाण्याचे नियोजन करावे, अशी सचूना आमदार जगताप यांनी केली आहे.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button