breaking-newsपुणे

विज्ञान क्षेत्रातही वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज

  • डॉ. जयंत नारळीकर यांचे मत

विज्ञानात एखादी गोष्ट अपवादात्मक आढळली, तर त्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. पण, ती दडपून टाकली जाते आणि तसे करण्यातच आम्ही आनंद मानतो. त्यामुळे विज्ञान क्षेत्रातही वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिरपेक्ष संशोधन करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज आहे, असे मत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी रविवारी व्यक्त केले.

मुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फे मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कार्यकर्ता अभ्यास शिबिराच्या समारोप सत्रात ‘वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आजचा समाज’ या विषयावर डॉ. जयंत नारळीकर आणि ज्येष्ठ गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमसुद्दीन तांबोळी, उपाध्यक्षा सायरा मुलाणी या वेळी उपस्थित होत्या.

नारळीकर म्हणाले, शास्त्रज्ञ या शब्दांत सगळी शास्त्रं ज्ञात आहेत असा अर्थ ध्वनित होतो. त्यामुळे शास्त्रज्ञ म्हणण्याऐवजी वैज्ञानिक म्हणायला हरकत नाही. राज्यघटनेमध्ये मिटवून टाकलेले भेद अजून व्यवहारातून गेलेले नाहीत. आपल्या पूर्वजांकडे खूप ज्ञानभांडार होते अशी आत्मप्रौढी मिरवण्यामध्ये आपल्याला आनंद वाटतो. पण, ज्ञान असले तरी त्याचे जतन आणि संरक्षण करून ते पुढच्या पिढीकडे संक्रमित करण्याची इच्छा असली पाहिजे. प्रत्येक शाळेने आठवडय़ाच्या वेळापत्रकामध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी एक तास राखून ठेवला पाहिजे. त्याची उत्तरे शोधून शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे समाधान केले पाहिजे. त्यातून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होईल.

मंगला नारळीकर म्हणाल्या, वैज्ञानिक हा सत्यशोधकच असतो. एक प्रकारची निर्भयता आणि मोकळं मन ठेवले तर सत्यशोधन करण्याची शक्यता असते. विज्ञानाने प्रस्थापित केलेल्या नियमांविरोधात जाणाऱ्या लोकांचा सल्ला नाकारण्याची शक्ती आपल्यात असली पाहिजे.

धार्मिक रूढी आणि नियम मधूनमधून तपासून घेत त्यातील फोलफट काढून टाकत तत्त्व कायम ठेवली पाहिजेत. विज्ञानाविरोधात जाणाऱ्या आणि बुद्धिप्रामाण्यवादी विचार नसलेल्या चमत्कारिक रूढी आपणच काढून टाकल्या पाहिजेत.

‘हाच खरा मानवतावादी विचार’

देव न मानणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन असा गैरसमज आहे, याकडे लक्ष वेधून मंगला नारळीकर म्हणाल्या, आपण पाप-पुण्याच्या कल्पना स्वच्छ करू. देवाच्या विरोधात शस्त्र उगारण्यापेक्षा धार्मिक रूढींचा आधार घेत दुसऱ्यावर अत्याचार किंवा त्याची पिळवणूक केली जाणार नाही अशी सुधारणा आपण करू या. हाच विवेकवादी आणि मानवतावादी विचार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button