breaking-newsक्रिडा

विजय शंकर चौथ्या क्रमांकासाठीचे हुकमी अस्त्र!

प्रत्येक विश्वचषक क्रिकेट स्पर्धा ही खास रणनीतीसाठी ओळखली जाते. तामिळनाडूचा युवा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर हा भारतीय संघ व्यवस्थापनाचा चौथ्या क्रमांकासाठीचा आश्चर्यकारक पर्याय ठरू शकतो.

२००३च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत व्हीव्हीएस लक्ष्मणला वगळून दिनेश मोंगियाला स्थान देण्यात आले. कारण तो फिरकी गोलंदाजी करू शकणारा अष्टपैलू खेळाडू होता. २०११च्या विश्वचषकात भारताने पाचवा गोलंदाज वापर केलेल्या युवराज सिंगच्या खात्यावर १५ बळी जमा होते.

२०१९च्या विश्वचषकाला सामोरे जाताना भारताला अद्यापही चौथ्या स्थानासाठीची उणीव तीव्रतेने भासते आहे. १५ ते २० एप्रिल या कालावधीत संघ जाहीर केला जाणार असल्यामुळे ‘आयपीएल’ ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या पहिल्या तीन आठवडय़ांमध्ये चौथ्या स्थानासाठीचे पर्याय स्पष्ट होऊ शकतील, अशी आशा आहे. शंकरचे तंत्र आणि कठीण परिस्थिती हाताळण्याच्या वृत्तीबाबत भारतीय संघव्यवस्थापन समाधानी असल्याचे म्हटले जात आहे.

चौथ्या स्थानासाठी अंबाती रायुडू दावेदार मानला जात होता. परंतु ४७ धावांची सरासरी असूनही, मागील सामन्यांमध्ये त्याला सातत्यपूर्ण कामगिरी दाखवण्यात अपयश आले आहे.

‘‘वेलिंग्टनची ९० धावांची खेळी वगळल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामन्यांमध्ये रायुडूला प्रभावी कामगिरी दाखवता आलेली नाही. ‘आयपीएल’मध्ये त्याने उत्तम कामगिरी दाखवल्यास त्याला आपले स्थान टिकवता येऊ शकेल. परंतु मध्यमगती गोलंदाजी खेळणे त्याला कठीण जात असल्याने त्याला भारतीय संघातील स्थान टिकवणे कठीण जाईल,’’ अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

चौथ्या क्रमांकासाठी पंतच योग्य -पाँटिग

नवी दिल्ली : ‘आयपीएल’मधील दिल्ली कॅपिटल संघाचा प्रशिक्षक रिकी पाँटिंगने विश्वचषकासाठीच्या भारतीय संघरचनेत ऋषभ पंतला चौथ्या क्रमांकावर पसंती दिली आहे. याचप्रमाणे पंतमध्ये सामना जिंकून देण्याची क्षमता असल्याचे पाँटिंगने नमूद केले आहे. ‘‘विश्वचषकाच्या भारतीय संघात पंतला चौथ्या क्रमांकावर स्थान देऊन मी तुम्हाला विश्वचषक जिंकवून दाखवू शकतो,’’ असा विश्वास दोन वेळा विश्वविजेत्या संघात समाविष्ट असलेल्या पाँटिंगने व्यक्त केला.

पंत हा भविष्यातील आशास्थान -गांगुली

नवी दिल्ली : यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत हा भारताचा भविष्यातील महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो, असा आशावाद माजी क्रिकेट कर्णधार सौरव गांगुलीने प्रकट केला. ‘‘येत्या काही दिवसांत ‘आयपीएल’मधून काही खेळाडूंची कामगिरी दिसू शकेल. पंत हा अतिशय गुणी खेळाडू असून, तो चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. त्याने थोडय़ा कालखंडात आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे,’’ असे गांगुलीने म्हटले आहे. मागील वर्षी आयपीएलमध्ये तो १४ सामने खेळला होता आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो दुसऱ्या स्थानावर होता, याकडे गांगुलीने लक्ष वेधले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button