breaking-newsमुंबई

वाऱ्याच्या तडाख्याचे तीन बळी

 

  • मुंबईत फांदी कोसळून जीवितहानी; बालकासह ३ जखमी

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘वायू’ चक्रीवादळामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुंबईत सोसाटय़ाचा वारा वाहू लागला असून वाऱ्याच्या तडाख्यात अणुशक्ती नगर, मालाड आणि जोगेश्वरी येथे वृक्ष उन्मळून तिघाजणांना प्राण गमवावे लागले. एका लहान मुलासह तीनजण जखमीही झाले आहेत.

शुक्रवारी पहाटे सहाच्या सुमारास अणुशक्ती नगर येथे फांदी कोसळून नितीन शिरवळकर(वय ४३) यांचा जागीच मृत्यू झाला. ते भाभा अणुसंशोधन केंद्राचे कर्मचारी होते, असे सांगण्यात आले. शुक्रवारी दुपारी मालाडच्या  विजयकर वाडी, भगवान भवन इमारतीजवळ झाडाची फांदी कोसळून शैलेश राठोड(३८) यांचा मृत्यू झाला. शैलेश हे पत्नीसोबत मंदिरातून घरी परतत असताना हा अपघात घडला. गुरुवारी जोगेश्वरी-मेघवाडी येथील संध्या नगर, तक्षशीला इमारतीच्या आवारात वृक्षाची फांदी पडल्याने अनील घोसाळकर(४८) गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. ते पेशाने वाहनचालक होते. इमारतीच्या आवारात आपली गाडी धुताना हा अपघात घडला.

अंधेरी (पूर्व) येथील टँक पाखाडी, सहार गाव येथील जोस कम्पाऊंडमधील झाड पडून झालेल्या दुर्घटनेत सुलोचना बल्लाप्पा (४५) आणि सायमन बल्लाप्पा (७)  हे दोघे जखमी झाले. अणुशक्ती नगर, बीएआरसी, गोवंडी परिसरात शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास वृक्ष कोसळून एकजण जखमी झाला असून त्याचे नाव समजू शकले नाही.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांमध्ये मुंबईमधील ६७ वृक्ष उन्मळून पडले, तर झाडांच्या १५० फांद्या तुटून पडल्याची माहिती पालिका सूत्रांकडून देण्यात आली. उन्मळून पडलेल्या वृक्षांमध्ये पालिकेच्या हद्दीतील १६, तर खासगी भूखंडावरील ५१ झाडांचा समावेश आहे. त्याचबरोबर पालिकेच्या हद्दीतील वृक्षांच्या ७०, तर खासगी भूखंडावरील वृक्षांच्या ८० फांद्या तुटून पडल्या.

दुचाकीस्वार अडचणीत

गेले दोन दिवस मुंबईत घोंघावणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढला आहे. मुंबईत १२ जून रोजी ताशी २० कि.मी., १३ जून रोजी ताशी २५ कि.मी., तर १४ जून रोजी ताशी २८ कि.मी. वेगाने वारा वाहत होता. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यांजवळील रस्त्यांवरून दुचाकीस्वारांना वाहन चालविणे अवघड बनले होते. वाऱ्यामुळे दुचाकीस्वारांचा अपघात होण्याची भीतीही वर्तविली जात होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button