breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाकडमधील पाणीटंचाई मुख्यमंत्र्यांनी घेतली मनावर, तत्काळ सोडविण्याचे दिले आश्वासन

  • माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांचा पाठपुरावा
  • मुख्यमंत्र्यांनी सोसायटी फेडरेशनसोबत केली समाधानकारक चर्चा

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

वाकड-पिंपळे निलख परिसरातील पाणीप्रश्नासंदर्भात काल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विश्वास दिला की “हा पाण्याचा प्रश्न आमचेच आमदार व नगरसेवक सोडवू शकतात. शंभर टक्के हा पाण्याचा प्रश्न येत्या काही दिवसांत सोडविला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांनी सांगितले.

“वाकड पिंपळे निलख परिसरात अपुरा पाणीपुरवठा, वाढलेली लोकसंख्या यामुळे अनेक सोसायटी व नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून या परिसरात अमृत योजना, पाण्याची टाकी अशी कामे तात्काळ करण्यात येत आहेत. गृहनिर्माण सोसायट्यांमार्फत “No Water, No Vote” आशा प्रकारचे आंदोलन करण्यात आले होते.

पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष सुदेश राजे, सेक्रेटरी करमचंद गर्ग, सभासद सचिन लोंढे  यांनी आमदार लक्ष्मण जगताप व माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत हा प्रश्न मार्गी लागणार असल्याने सांगितले होते. मुखयमंत्र्यांची भेट घडवून आणत हा प्रश्न निकाली काढणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार त्यांनी याचा पाठपुरावा सुध्दा केला.

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की “शहरातील लोकसंख्येपेक्षा अपुरे पाणी आपल्याला मिळत असल्याने ही पाणीटंचाई उद्भवत आहे. भामा-आसखेड धरणातून अतिरिक्त पाणीसाठा मंजूर करून घेतला आहे. त्याचे काम प्रगतीपथावर आहे. शहरात अमृत योजनेचे काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे. येत्या काळात ही कामे केली जातील.

वाकड परिसरातील नागरिकांना विरोधकांमार्फत भडकवण्याचे काम चालू आहे. अनेक वर्षे घरात सत्ता असून ज्यांना याचे नियोजन करता आले नाही. ते आता लोकांचे लक्ष वेधण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. पण आमचे नियोजन व काम प्रगतीपथावर असल्याने आम्ही यावर विश्वासाने बोलत आहोत.” 

माजी नगरसेवक विनायक गायकवाड म्हणाले की ” वाकड परिसरात लोकसंख्येचा विचार करता पाणी पुरवठ्यासंदर्भात नियोजनबद्ध काम होत आहे. भविष्यकाळात ही समस्या कायमची दूर होईल. आमचा आमच्या नेतृत्वावर व कामावर विश्वास आहे.

पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष सुदेश राजे म्हणाले की “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार लक्ष्मण जगताप व माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांच्यासमवेत शहरातील हौसिंग सोसायट्यांना होणाऱ्या पाण्याच्या समस्येबाबत सकारात्मक चर्चा झाली. ही समस्या का उद्भवली, तसेच त्यावरील उपाय योजना व चालू कामाबद्दल सखोल माहिती मिळाली. लवकरात लवकर ही समस्या सुटणार आहे. शहराचे प्रतिनिधी याबाबत अतिशय संवेदनशील आहेत, हे मुख्यमंत्र्यांच्या चर्चेमधून समोर आले.”

वाकड, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर व इतर परिसरातील अनेक सोसायट्यांतर्फे फेडरेशनच्या वतीने ही समाधानकारक चर्चा करण्यात आल्याने फेडरेशनच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार लक्ष्मण जगताप यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button