breaking-newsताज्या घडामोडीलेख

लाल बहाद्दुर शास्त्री : पाकिस्तानला धडा शिकवणार अन्‌ ताश्कंद करार यशस्वी करणारा असामान्य पंतप्रधान!

तोफा आणि बंदुका इतकेच आपल्या देशात नांगराचे महत्त्व आहे. या देशातील शेतकरी खऱ्या अर्थाने मातृभूमीचे रक्षक आहेत, असा विचार देशवासीयांना देणारे आणि ‘जय जवान जय किसान’ अशी सिंहगर्जना करणारे देशाचे दुसरे पंतप्रधान स्व. लाल बहाद्दुर शास्त्री यांची आज (दि.११) पुण्यतिथी त्यानिमित्त जाणून घेवूयात त्यांच्या जीवनातील काही प्रसंग…
‘लहान मूर्ती पण थोर कीर्ति’ असे लालबहादूर शास्त्री यांचे वर्णन केल्यास वावगे ठऱणार नाही. शास्त्रीजींचा जन्म 2 ऑक्टोबर, 1904 रोजी मोगलसराय येथे शारदा प्रसाद या शिक्षकाच्या कुटुंबात झाला. शास्त्रीजी दीड वर्षांचे असताना त्यांच्या ‍वडिलांचा अकाली मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी शास्त्रीजींच्या मातोश्री रामदुलारी यांच्यावर आली. शास्त्रींना बाल वयापासूनच लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, लाला लजपतराय यांच्यासारख्या महापुरुषांची भाषणे ऐकण्याचा छंद होता. बनारस येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर उच्चशिक्षणासाठी ते काशी येथील राष्ट्रीय विद्यापीठात दाखल झाले आणि तेथेच 1926 मध्ये त्यांना विद्यापीठाने ‘शास्त्री’ ही पदवी बहाल केली.
स्वातंत्र्य संग्रामात योगदान
ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारतमातेची मुक्तता करण्यासाठी आपण योगदान दिले पाहिजे, या भावनेतून त्यांनी वयाच्या 17 व्या वर्षी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली. प्रथम त्यांनी 1930 मध्ये गांधीजींच्या ‍सविनय कायदेभंग चळवळीत सक्रीय सहभाग घेतला. ब्रिटिश सरकारच्या जुलमी राजवटीविरूद्ध जाहीर वक्तव्य केल्याबद्दल त्यांना अडीच वर्षांची कारावासाची शिक्षा झाली. वास्तवात शास्त्रीजींच्या घरची स्थिती खूपच हलाखीची होती. शास्त्री तुरुंगात असताना त्यांची दीड वर्षाची कन्या मंजू विषमज्वराने आजारी पडली. त्यांच्या पत्नी ‍ललितादेवी औषधोपचरासाठी पुरेसा पैसा जमा करु शकल्या नाहीत. त्यातच त्यांच्या कन्येचा मृत्यू झाला. गांधीजींच्या खांद्याला खांदा लावून शास्त्रीजींनी 1942 च्या चलेजाव जळवळीत भाग घेऊन इंग्रजांना भारत छोडोचा सज्जड इशारा दिला. 1932 ते 1945 दरम्यान शास्त्रीजींना सात वेळा अटक होऊन त्यांनी नऊ वर्षे तुरुंगवास भोगला.
यशस्वी राजकीय कारकीर्द
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1952 मध्ये शास्त्रीजींची राज्यसभेवर निवड झाल्यावर पंडित नेहरुंनी आपल्या मंत्रिमंडळात त्यांची रेल्वेमंत्री म्हणून नेमणूक केली. रेल्वेमंत्री म्हणून कायर्रत असताना 1956 मध्ये आरियालूर येथे रेल्वेचा भीषण आपघात झाला असता त्यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारुन पदाचा तत्काळ राजीनामा दिला. त्यानंतर 1956 मध्ये अलाहाबाद मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आल्यावर त्यांच्याकडे दळणवळण व उद्योग खाते सोपविण्यात आले. इतकेच नव्हे तर, त्यांच्या एकंदरीत कार्यपद्धतीवर खूश होऊन पंडित नेहरुंनी आपल्या आजारपणाच्या कालावधीत शास्त्रीजींना बिनखात्याचे मंत्री म्हणून नियुक्त केले. त्याकाळात त्यांनी अप्रत्यक्षरित्या नेहरुंच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार सांभाळला. नेहरुंच्या निधनानंतर शास्त्रीजींनी 27 मे, 1964 रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पंतप्रधानपदाची धरा सांभाळल्यावर राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात ते म्हणाले, ”भारतात निरनिराळ्या प्रदेशात भिन्न भिन्न प्रकारची भाषा बोलणारे लोक राहतात. त्यांनी आपले प्रादेशिक प्रश्न बाजूला सारुन प्रथम आपण भारतीय आहोत याची जाणीव ठेवावी. ‘एक देश- एक राष्ट्र’ या अभेद्य चौकटीत राहूनच आपण आपले मतभेद मिटविले पाहिजेत. एकात्मतेची भावना वृद्धिंगत करुन राष्ट्रीय एकजुटीसाठी आपण सर्वजन निकराचे प्रयत्न करुया.” शास्त्रीजींच्या जाज्वल्य देशाभिमानाचे प्रतिबिंब यातून दृष्टोत्पत्तीस येते.


सामान्यांतील असामान्य
शास्त्रीजींचा स्वभाव अत्यंत शांत, सुस्वाभवी व संयमी होता. गोरगरीबांबद्दल त्यांना खूप कणव होती. चिडणे, रागावणे, दुसर्‍या अवमान करणे वा राजकारणाचे कुटिल डावपेच खेळणे या गोष्टी त्यांच्या स्वभावात तीळमात्रही नव्हत्या. केंद्रीय गृहमंत्री असताना देखील अलाहाबाद या त्यांच्या गावी शास्त्रीजींचे स्वत:च्या मालकीचं घर नव्हतं, त्यामुळे शहरातले स्नेही-मित्र त्यांना घर नसलेला गृहमंत्री (होमलेस होम मिनिस्टर) असं मिश्किलपणे म्हणत असत. स्वत:साठी वा आपल्या कुटुंबियांसाठी काहीही न करता, त्यांनी देशातील गोरगरीब, दुर्लक्षित घटकांच्या सर्वांगिण विकासासाठी आपलं सारं आयुष्य पणाला लावलं. त्यांची राहणी अत्यंत साधी होती.
लंडन येथे राष्ट्रकूल परिषदेतही त्यांचा पोषाख नेहमीप्रमाणेच धोतर, सदरा व गांधीटोपी असाच होता. बोलण्या-चालण्यात नि वागण्यात ते जेवढे नम्र होते, तेवढेच ते मनाचे खंबीर होते. जनसामान्यांचा गराडा सदैव त्यांच्या अवतीभोवती असे. तासनतास कार्यकर्त्यांशी बोलणे, त्यांच्या अडचणी, प्रश्न समजावून घेऊन त्यांचे निरसन करण्यासाठी त्वरेने पावले उचलणे ही त्यांची नित्याची कामे असत. त्यामुळेच शास्त्रीजींची ‘सामान्यांतील असामान्य’ म्हणून जनमानसात ओळख होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधानासारख्या सर्वोच्च पदावर काम करणार्‍या शास्त्रीजींच्या मालकीचं स्वत:चं एखादं घर, जमिनीची तुकडा वा बँक बॅलन्स नसणे, हेच त्यांच्या निस्पृह व निस्वार्थी सेवाभावीवृत्तीचं प्रतीक होय.
पाकला धडा शिकविला
पाकिस्तानाची निर्मिती झाल्यापासून पाकने काश्मीर, कच्छ व अन्य प्रदेशांवर अनेक सशस्त्र आक्रमणं केली. हे युद्धखोरीचे धोरण पाकने बदलावे व भारताशी सलोख्याने राहावे, यासाठी तत्कालिन राज्यकर्त्यांनी अनेक वेळा पाकच्या राष्ट्राध्यक्षांना फर्मान पाठविले, परंतु त्याकडे हेतूपुरस्कार दुर्लक्ष करून पाकने आपले सशस्त्र हल्ले चालूच ठेवले. एवढ्यावर न थांबता, पाकिस्तानने 14 ऑगस्ट 1965 रोजी सियालकोट येथील युद्धबंदी रेषा ओलांडून भारतावर आक्रमण केले. पाकला यावेळी चांगला धडा शिकवावा, या हेतूने शास्त्रीजींनी भारतीय सेनेला पाकवर थेट आक्रमण करण्याचा आदेश दिला. दरम्यान शास्त्रीजींनी आपल्या जवानांचे तसेच शेतकर्‍यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी ‘जय जवान-जय किसान’ चा नारा दिला. 48 दिवस हे युद्ध चालले. भारतीय सैनिकांनी पाकचे 400 टँक उद्धवस्त केले. शास्त्रीजींनी वेळीच लढाऊ भूमिका घेतल्याने पाकला पळताभुई थोडी झाली. लहानपणापासूनच ‘नन्हे’ ह्या लाडक्या नावाने संबोधल्या जाणार्‍या शास्त्रीजींनी पाकवर विजयश्री संपादन करून हिमालयापेक्षाही आपली उंची जास्त आहे, हे सार्‍या जगाला दाखवून दिले. भावी पिढ्या शास्त्रीजींच्या या देदिप्यमान कामगिरीला चिरकाल स्मरणात ठेवतील आणि त्यातून ते स्फूर्ती घेऊन राष्ट्रसेवेत आपले योगदान देतील. एखाद्या झुंजार योद्याप्रमाणे शास्त्रीजींच्या अंगी शौर्य होतं. भारत-पाक युद्धात चिमुकल्या पण चपळ ‘नॅट’ विमानांनी पाकिस्तानच्या अवाढव्य ‘सेबरजेट’ निस्टार फायटर सारख्या विमानांचा कसा धुव्वा उडवला, याचं वर्णन करताना शास्त्रीजी एका जाहीर सभेत मिश्किलपणे म्हणाले, ” कभी कभी छोटी चीजे भी बडा काम कर जाती है” हे ऐकून श्रोत्यांमध्ये प्रचंड हास्यकल्लोळ उडाला. कारण पाकचे राष्ट्राध्यक्ष अयुबखान सहा फूट उंचीचा एक धिप्पाड पुरुष, तर शास्त्रीजी हे केवळ पाच फूट उंचीचे होते. अशा वामनमूर्ती शास्त्रीजींनी एका आडदांड अयुबला पराभवाची धुळ चारली.


ताश्कंद कराराचे यश
पाकिस्तानावर विजयश्री संपादन केल्यावर भविष्यात पाकने अशा युद्धखोरीच्या कारवाया करु नये, यासाठी सोव्हिएत रशियाचे तत्कालिन पंतप्रधान अलेक्सी कोसिजीन यांनी पुढाकार घेऊन भारताच्या संमतीने ताश्कंद येथे ‘भारत-पाक शांतता करार’ करण्याचा तोडगा काढला. पाकचे तत्कालीन अध्यक्ष जनरल अयुबखान यांना ताश्कंद येथे येण्याचे बंधन घातले. लालबहादूर शास्‍त्री आणि अयुबखान यांनी 10 जानेवारी, 1966 रोजी अलेक्सी कोसिजीन यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐतिहासिक ताश्कंद करारावर स्वाक्षर्‍या केल्या. लालबहादूर शास्‍त्री यांच्या मुत्सद्दीगिरीने भारताचा नैतिक विजय झाला आणि शास्त्रीजींनी सार्‍या विश्वात भारताची मान उंच केली. भारत शांततावादी धोरणाचा पुरस्कर्ता आहे, याची ग्वाही या करारातून त्यांनी जगाला दिली. ‍ताश्कंद करार हा शास्त्रीजींनी भारताला दिलेली एक अनमोल भेट होती. ताश्कंदवर शांततेच्या धवलध्वज फडकावून शास्त्रीजींनी भारत मातेला अंतिम प्रणाम केला.
शास्त्रींचा ‘जय जवान-जय किसान’ हा नारा फलद्रुप होण्यासाठी ठोस कृतीची गरज आहे. समाजातील विविध जातीधर्मांमध्ये तेढ निर्माण करणार्‍या दहशतवाद्यांना भुईसपाट करण्यासाठी भारतीय जवानांचे तर देशाला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी किसानांचे हात बळकट करावयास पाहिजेत. असं केल्याने समाजविघातक शक्तींचे दुष्ट मनसुबे नेस्तनाबुत करणे सहज शक्य होऊ शकेल, याचा विश्वास आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button