breaking-newsक्रिडापुणेमहाराष्ट्र

रोलबॉल फेडरेशन करंडक : महाराष्ट्र, जम्मू-काश्‍मीर उपान्त्य फेरीत

  •  छत्तीसगड, हरयाणा, झारखंड पराभूत

पुणे: महाराष्ट्र, जम्मू काश्‍मीर, आसाम या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करताना दुसऱ्या राष्ट्रीय रोलबॉल फेडरेशन करंडक स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत धडाक्‍यात प्रवेश केला आहे. मुलांच्या गटातील उपान्त्य फेरीत महाराष्ट्र संघासमोर जम्मू-काश्‍मीर संघाचे, तर उत्तर प्रदेश संघासमोर आसाम संघाचे आव्हान असणार आहे. मुलींच्या गटातील उपान्त्य फेरीत महाराष्ट्र संघासमोर आसाम संघाचे, तर राजस्थान संघासमोर जम्मू-काश्‍मीर संघाचे आव्हान आहे.

गुवाहाटीतील नेहरू स्टेडियम सुरू असलेल्या या स्पर्धेतील मुलांच्या गटाच्या लढतीत महाराष्ट्र संघांने झारखंड संघाला 9-1 असे एकतर्फी पराभूत करताना स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्र संघाकडून मिहीर सानेने 3, योगेश तायडे व सौरभ भालेराव यांनी प्रत्येकी 2 तर, भार्गव घारपुरे व संजोग तापकीर यांनी प्रत्येकी 1 गोल करताना संघाच्या विजयात मोलाचा वाता उचलला. झारखंड संघाकडून एकमात्र गोल मुकेश मुखीने केला. मध्यंतराला महाराष्ट्र संघाने 6-0 अशी आघाडी घेतली होती.

मुलांच्या गटातील आणखी एका लढतीत जम्मू-काश्‍मीर संघाने कर्नाटक संघाला 3-1 असे पराभूत करताना उपान्त्य फेरी गाठली. जम्मू-काश्‍मीर संघाकडून भानू खजुरियाने 2 तर अमरीतपाल सिंगने 1 गोल केला. कर्नाटक संघाकडून जय सडेकरने 1 गोल नोंदविला. मध्यंतराला कर्नाटक संघाने 1-0 अशी आघाडी घेतली होती. उत्तर प्रदेश संघाने छत्तीसगड संघाला 11-1 असे एकतर्फी पराभूत करताना मुलांच्या गटातील उपान्त्य फेरीत आपले स्थान निश्‍चित केले.

मुलींच्या गटातील लढतीतीत महाराष्ट्र संघाने छत्तीसगड संघाला 5-0 असे एकतर्फी पराभूत करताना स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्र संघाकडून कर्णधार मानसी मारणे व श्वेता कदम यांनी प्रत्येकी 2 तर सुमेधा बोराडेने 1 गोल करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. छत्तीसगड संघाला एकाही गोल नोंदवता आला नाही. मध्यंतराला महाराष्ट्र संघाने 2-0 अशी आघाडी घेतली होती.

मुलींच्या गटातील दुसऱ्या सामन्यात राजस्थान संघाने मध्य प्रदेश संघाला 5-1 असे पराभूत करताना स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत प्रवेश केला. राजस्थान संघाकडून रिंकू सोनीने 3 तर पूजा चौधरी व के. तन्वीने प्रत्येकी एक गोल करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button