breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादीच्या त्या चार नगरसेवकांची भाजपसोबत छुपी युती?

  • सत्ताधारी भाजपच्या सुरात सुर मिसळून कामकाज केल्याचा आरोप
  • विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी थेट पवार यांच्याकडे केली तक्रार

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – संतपीठाच्या निविदेचा विषय स्थायी समितीच्या मंजुरीसाठी आला असताना स्थायीतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी त्याच्या विरोधात चक्कार शब्द उच्चारला नाही. असे असताना विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी मात्र या विषयाला कडाडून विरोध केला आहे. स्थायीच्या बैठकीतच विरोध केला असता, तर हा विषय मंजूर झालाच नसता. स्थायीच्या बैठकीत मूग गिळून गप्प बसणा-या या चार नगरसेवकांनी भाजपसोबत छुपी युती केल्याचा ठपका ठेवला जात आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे त्यांची तक्रार केली आहे, असे साने यांनी सांगितले. त्यांच्यावर खरोखर कारवाई होणार की त्यांना अभय दिले जाणार, हे पाहण्यासाठी याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादीचे माजी महापौर राजू मिसाळ, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, नगरसेविका प्रज्ञा खानोलकर, गीता मंचरकर हे चार सदस्य आहेत. सत्तेच्या बळावर सत्ताधारी भाजपच्या पदाधिका-यांनी एखादा विषय रेटून नेण्याचा प्रयत्न केला तर त्याला लागलीच विरोध करून त्यांना नियमानुसार कामकाज करण्यास भाग पाडण्याची जबाबदारी विरोधकांची असते. त्यातच गेल्या पंधरा दिवसांपासून संतपीठाचा विषय मोठ्या प्रमाणात गाजत आहे. संतपीठाच्या समितीमध्ये सदस्य निवडताना राष्ट्रवादीने 2016 रोजी ठेवलेला प्रस्ताव डावलून भाजप पदाधिका-यांनी ‘हम करे सो कायदा’ चालविला आहे. त्यांच्या मर्जीप्रमाणे संतपीठाच्या समितीमध्ये सदस्य निवडण्यात येत आहेत. संतपीठाच्या निविदा काढताना देखील मोजक्याच लोकांना डोळ्यासमोर ठेवून निविदा राबविली जात असल्याचा आरोप साने यांनी आज केला आहे.

संतपीठाच्या कामाची 45 कोटींची निविदा स्थायीच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आली तेव्हा विरोधक म्हणून राष्ट्रवादीच्या चारपैकी एकाही नगरसेवकाने याला विरोध केला नाही. मात्र, आज साने यांनी जाहीरपणे या निविदेला विरोध केला आहे. यात रिंग झाल्याचे साने यांचे म्हणणे आहे. स्थायी समितीत या प्रस्तावाला विरोध केला असता तर हा विषय मंजूर झालाच नसता. स्थायीतील राष्ट्रवादीचे नगरसेवक या विषयावर गप्प बसले याचा अर्थ सत्ताधारी भाजप आणि त्यांच्यात अर्थपूर्ण राजकारण होत आहे की काय, असा संशय वाटू लागला आहे. मात्र, दत्ता साने आपल्या मूळ भूमिकेवर ठाम आहेत. माझा संतपीठाच्या निविदा प्रक्रियेवर आक्षेप असून त्यात गैरव्यवहार झाल्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. पुढील सर्वसाधारण सभेत सभागृहासमोर ते पुरावे सादर करणार आहे. आणि स्थायी समितीमध्ये डोळ्यात धूळ फेकून सत्ताधा-यांनी विषय रेटून नेला असताना मुग गिळून गप्प बसणा-या वरील चार नगरसेवकांची तक्रार मी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे केली आहे, असे साने यांनी सांगितले.

त्या चार नगरसेवकांची आता खैर नाही
नुकतेच नगर महापालिकेच्या महापौर निवडीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दर्षविला. त्यावर भाजपला पाठिंबा देऊ नये, अशी सूचना केली असताना पक्षादेश झुगारून पाठिंबा देणा-या नगरसेवकांवर कारवाई करण्याचा निर्णय पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतला आहे. आता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये सदस्य असलेल्या पक्षाच्या चार नगरसेवकांनी सत्ताधारी भाजपच्या सुरात सुर मिसळून कामकाज सुरू केले आहे. विरोधात भूमिका न घेता केवळ आर्थिक हीत जोपासण्यावर लक्ष केंद्रीत केले असल्याची चर्चाही पालिका वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे त्यांची तक्रार साने यांनी थेट पवार यांच्याकडे केली आहे. त्यामुळे नगर महापालिकेतील नगरसेवकांबरोबर पिंपरी पालिकेतील चार नगरसेवकांवर देखील कारवाई होण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button