रावेर मतदार संघावरून भाजपचे एकनाथ खडसे आणि शिवसैनिक आमने-सामने
जळगाव- रावेर मतदार संघावरून भाजपचे एकनाथ खडसे आणि शिवसैनिक आमने सामने आले आहेत. त्यांच्यात वाद होत असून ही जागा युतीने शिवसेनेकडे ठेवावी, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे. यासाठी जिल्हाप्रमुखांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा पवित्रा देखील शिवसैनिकांनी घेतला आहे.
रावेरमधून एकनाथ खडसे यांच्या सूनबाई सध्या खासदार आहेत. रावेर लोकसभा मतदार संघात भाजपने शिवसेनेला नेहमीच डावललं आहे, असा शिवसैनिकांचा आरोप आहे. त्यामुळे आता राज्यात शिवसेना भाजप-युती झाली असताना या मतदारसंघातील शिवसैनिकांत खदखद वाढलेली आहे.
एकनाथ खडसे यांच्या परिवारातील उमेदवार असल्यास शिवसेना युतीचे काम करणार नाही, किंवा ही जागा वाटाघाटीत शिवसेनेला घ्या, असा पवित्रा शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी घेतला आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व शिवसैनिक मुक्ताईनगर येथील शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांचे निवासस्थान असलेल्या शिवनेरी बंगल्यावर प्रचंड ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती आहे.