breaking-newsपिंपरी / चिंचवड

‘राजगृह’ तोडफोड प्रकरणातील अपप्रवृत्तींना तत्काळ शिक्षा करा

  • पिंपरी-चिंचवड एमआयएमची पोलिसांकडे मागणी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथील निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी एमआयएमच्या वतीने करण्यात आली आहे.

यासंदर्भात एमआयएमचे प्रदेश महासचिव अकिल मुजावर यांच्या वतीने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृहा’वर दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड झाली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड झाली. घराच्या काचांवरही दगडफेक झाली. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले.

राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेट देतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे श्रद्धास्थान आहे. कोरोनासारख्या भयानक साथीच्या पार्श्र्वभूमीवर केलेले तोडफोडीचे कृत्य निषेधार्ह आहे.

या प्रकरणात सामील असलेले आरोपी आणि त्यामागे असणाऱ्या प्रवृत्ती यांचा उद्देश जातीय दंगली घडविण्याचा, भारतभरातील, जगभरातील आंबेडकर अनुयायांची अस्मिता दुखावून त्यांना आंदोलन करण्यासाठी प्रवृत्त करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न दिसत आहे. तरी लवकरात लवकर तोडफोड करणा-या गुन्हेगारांना अटक करून त्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी मुजावर यांनी केली आहे.

निवेदनावर प्रदेश महासचिव अकील मुजावर यांच्यासह प्रवक्ता धम्मराज साळवे, शहराध्यक्ष अर्चना परब, कार्यालयीन सचिव संतोष शिंदे यांच्या स्वाक्षरी आहेत. तसेच, हे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांना ईमेलद्वारे पाठविण्यात आले आहे, असे निवेदनात नमूद आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button