breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

राजकीय वर्चस्वासाठी भाजपचे सहकारअस्त्र

विरोधकांच्या सहकारी संस्थांची चौकशी; कार्यकर्त्यांच्या सहकारातील शिरकावाला मदतीचा हात

राज्याच्या राजकारणावरील प्रभुत्व वाढवण्यासाठी भाजपने सहकारअस्त्राचा वापर करण्याची खेळी सुरू केली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सहकार क्षेत्रातील वर्चस्वाची मोठी मदत होत असल्याने त्यांच्या सहकारी संस्थांची चौकशी करण्यात येत असून, त्याचवेळी भाजपच्या कार्यकर्त्यांचा सहकारात शिरकाव व्हावा यासाठी मदतीचा हात देण्याचे धोरण आखण्यात आले आहे. त्यातूनच महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे.

पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या भागात प्रामुख्याने सहकाराच्या माध्यमातून कॉंग्रेस व त्यातही राष्ट्रवादी कॉंग्रेस राजकीय वर्चस्व गाजवत आली आहे. सहकाराच्या माध्यमातून या दोन्ही पक्षांकडे लाखो कार्यकर्त्यांचे जाळे आहे. सहकारी संस्थांमधून नोकरीला असलेली मंडळीही या दोन्ही पक्षांच्या राजकारणासाठी कामी येतात. आताही विदर्भाच्या तुलनेत याच भागांमध्ये भाजप व दोन्ही कॉंग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच होणार आहे. राज्याच्या राजकारणातील या महत्त्वाच्या क्षेत्रात भाजपचे मोजकेच नेते जम बसवू शकले आहेत. त्यामुळेच आता भाजपने सहकारअस्त्राचा दुहेरी वापर करण्याची रणनीती आखली आहे.

सहकारात काम करणाऱ्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या राजकारण्यांना नामोहरम करण्यासाठी सहकारी संस्थांच्या चौकशीचे सत्र सुरू झाले आहे. त्यातून आगामी निवडणुकीच्या काळात अनेकांची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल. अशी चौकशी सुरू झाली असल्याच्या वृत्ताला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनीही दुजोरा दिला.

एकीकडे विरोधकांना नामोहरम करण्यासाठी सहकारचा वापर केला जात असताना आपल्या कार्यकर्त्यांना व त्यातून भाजपला तारण्यासाठी सहकार विभागाचा उपयोग केला जात आहे. त्यासाठीच महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. बरीच वर्षे ही संस्था जवळपास ठप्प झाली होती. आता त्याचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. राज्यभरातील सहकारी संस्थांना याचे सभासद होण्यासाठी पत्रे पाठवण्यात येत आहेत. या संस्थेच्या माध्यमातून सहकारी संस्थांना मदतीचे आश्वासन देण्यात येत आहे. नुकतेच भाजपच्या कार्यकर्त्यांशी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी संवाद साधला. १९९८ मध्ये आपण लोकमंगल संस्था स्थापन केली. आज त्याचे रूपांतर मोठय़ा संस्थेत झाले आहे, असे स्वत:चे उदाहरण देत देशमुख यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन दिले. संस्थांना राज्य सरकार विविध माध्यमातून मदत करेल. सहकारी संस्थेच्या माध्यमातून संबंधित उद्योगाशी निगडीत अर्थकारण उभे राहते, लोकांना रोजगार मिळतो, याकडे देशमुख यांनी लक्ष वेधले. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे पुनरुज्जीवनाबरोबरच अटल सहकारी अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत १५०० हून अधिक सहकारी संस्थांचे पुनरुज्जीवन केले आहे. तीन हजारांहून अधिक नवीन संस्था सुरू करण्याचे नियोजन आहे. कार्यकर्त्यांनी याचा उपयोग आपल्या भागाचा विकास करण्यासाठी करून घ्यावा, असे आवाहनही देशमुख यांनी कार्यकर्ताशी संवाद साधताना केले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी सहकाराच्या क्षेत्रात काम करावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ग्रामीण अर्थकारणाला चालना देण्यासह रोजगार निर्मितीची मोठी संधी यात आहे.  अटल सहकारी अभियान गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. नवीन संस्था पक्ष बघून देणार नाही. पण भाजप कार्यकर्त्यांनी त्यात रस घ्यावा, असा आमचा प्रयत्न आहे, असे देशमुख यांनी सांगितले.

राज्यात हजारो सहकारी संस्था कार्यरत आहेत. त्यात पतपेढय़ांपासून कृषी उत्पन्न बाजार समित्या, दूध संघ, साखर कारखाने अशा विविध क्षेत्रातील संस्थांचा समावेश आहे. त्यातील अनियमितता, भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी येतात. त्यामुळे विविध संस्थांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्याचा राजकारणाशी संबंध नाही. सहकार क्षेत्र हे कार्यक्षम असावे, तेथील कारभार पारदर्शक असावा, हे पाहण्याची जबाबदारीच सहकार विभागाची आहे.      – सुभाष देशमुख, सहकारमंत्री

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button