breaking-newsपिंपरी / चिंचवड

रतन टाटा यांचे सहकार्य भारतीय कामगार कधीच विसरणार नाहीत – इरफान सय्यद

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

देशासह राज्यावर कोरोना विषाणू या आजाराचे महाभयंकर संकट आले आहे. याचा वेळीच धोका ओळखून टाटा समुहाचे  चेअरमन रतन टाटा यांनी संकटात सहकार्य म्हणून पंतप्रधान सहाय्यता निधीस दीड हजार कोटी रूपये दिले. तसेच विविध डॉक्टर, नर्सेस, कर्मचा-यांच्या निवासी व्यवस्थेसाठी ‘ताज ‘ हे प्रसिद्ध हॉटेल देखील दिले. याशिवाय विविध जीवनावश्यक वस्तूंची मदतही टाटा समूह करीत आहे. महाराष्ट्र मजदूर संघटनेचे माथाडी कामगार आणि सभासद हे टाटा मोटर्स व टाटा समूहाशी संलग्न कंपन्यांत काम करीत आहेत. टाटा समुहाचे चेअरमन रतन टाटा हे आमचे अन्नदाते आहेत. अशा या देवदुताच्या कंपनीत आम्ही काम करतो, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.  तसेच त्यांच्या या महान कार्याला सलाम, असे गौरवोद्गार महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इरफान सय्यद यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे काढले आहेत.

इरफान सय्यद म्हणाले, देशावर कोणतेही संकट आले असता रतन टाटा देशवासीयांच्या मदतीला नेहमीच धावून येतात. कोरोनाने देशात प्रचंड थैमान घातले आहे. अशा वेळेस सर्वप्रथम रतन टाटा यांनी मोठी आर्थिक मदत देशाला केली. त्यामुळे भारत देशातील सर्वसामान्य नागरिक या नात्याने व आमच्या संघटनेच्या वतीने रतन टाटा यांचे आभार मानतो. टाटा मोटर्स आणि पिंपरी-चिंचवड शहर यांचे एक अनोखे नाते आहे.  6 एप्रिल 1964 रोजी टाटा मोटर्स म्हणजेच पुर्वीची ‘ टेल्को ‘ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कंपनीच्या पहिल्या प्लांटचे पिंपरी येथे उद्घाटन झाले. 6 एप्रिल 2020 रोजी या कंपनीच्या स्थापनेला बरोबर 56  वर्षे पूर्ण झाली.

‘ टाटा मोटर्स ‘ ही कंपनी आजही पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात योगदान देत आहे. आज ‘ टाटा मोटर्स ‘ वर अबलंवुन असणा-या अनेक छोट्या मोठ्या कंपन्या, लघुउदयोग शहरात आहेत. या लघु-उद्योगावर उदरनिर्वाह करणारा कामगार लाखोंच्या संख्येने शहरात आहे. ‘टाटा मोटर्स’ने विविध कंपन्याची निर्मीती केली आहे. त्याही पिंपरी-चिंचवड शहरात आहेत. म्हणजे काय तर, कामगारनगरी म्हणून उदयास आलेल्या कामगारनगरीचा मुळ पाया ‘ टाटा मोटर्स’ कंपनी आहे. आज 8500 च्या जवळपास कामगार या कंपनीत काम करतात. तसेच 600 ते 700 च्या जवळपास नोंदीत माथाडी कामगारसुद्धा या कंपनीत काम करून, आपला उदरनिर्वाह करीत आहेत.

माथाडी कामगार काम करीत असलेल्या कंपन्यानी माथाडी कायद्याला केराची टोपली दाखवण्यात धन्यता मानली. पण, जवळपास 600 ते 700 माथाडी कामगार काम करीत असतानासुद्धा माथाडी कायदा पाळण्याचे काम ‘ टाटा मोटर्स ‘ ही कंपनी करीत आहे. म्हणजे थोडक्यात कामगारांचा अन्नदाता होण्याचे काम ‘ टाटा मोटर्स ‘ या कंपनीचे व्यवस्थापन करीत आहे.

आज महाराष्ट्रासह देशात कोरोना विषाणू या आजाराचे संकट आले आहे. टाटा मोटर्सचे अध्यक्ष रतन टाटा यांनी पंधरा हजार कोटी रूपये या संकटाचा सामना करण्यास ‘ प्रधानमंत्री सहाय्यता निधी’ मध्ये दिले. तसेच मुंबई येथील आपल्या प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमधील खोल्या कोरोनाचा सामना करणा-या डॉक्टर, नर्सेस तसेच विविध कर्मचारी यांना राहण्यासाठी दिल्या आहेत. याशिवाय अनेक जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, भोजन यांचा ही पुरवठा टाटा मोटर्स यांच्या सुरु आहे.

एका मुलाखतीत रतन टाटा यांनी सांगितले की, देशावरील संकट टाळण्यासाठी जी काही मदत करायची आहे, त्याकरीता माझी कमावलेली पुर्ण संपत्ती जरी, मदत म्हणून द्यायला लागली तरी, मी ती देईलच. अशा या महान देशकार्याला आज कोणतीच उपमा देता येणार नाही. आज देशातील संकटसमयी टाटा समुहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी जे योगदान दिले आहे, त्यांचे ॠण आम्ही भारतीय नागरीक कधीच विसरणार नाहीत. सध्याच्या परिस्थितीत रतन टाटा यांच्या रूपाने देवदुतच भारतीयांच्या मदतीला धावून आला आहे. त्यामुळे समस्त भारतीयांनी देखील कोरोना विरूद्धचे युध्द जिकण्यासाठी घरातच रहावे. तसेच शहरातील दानशूर व्यक्तींनी जमेल तेवढी मदत प्रधानमंत्री व मुख्यमंत्री सहायता निधीला करावी, असे आवाहन सय्यद यांनी या पत्रकाद्वारे केले आहे.

‘महाराष्ट्र मजदूर संघटने ‘ च्या माध्यमातून अनेक कामगार हे टाटा मोटर्स व टाटा समूहाशी संलग्न कंपन्यांत काम करीत आहेत. या कंपनीने कोणताही दुजाभाव न करता नेहमीच कामगारांचे हीत जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. रतन टाटा यांनी आज देशाला जे काही सहकार्य केले, त्यांचे ॠण आम्ही कामगार कधीच विसरणार नाहीत. आजच्या संकटात तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहिलात, हे सदैव स्मरणात ठेऊन, महाराष्ट्र मजदूर संघटना व आमचे कामगार नेते इरफान सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कामगार टाटा मोटर्स व टाटा समूह संलग्न कंपन्यांच्या उत्पन्नवाढीसाठी व कंपनीच्या उत्कर्षासाठी सदैव कटिबद्ध राहू.  
– इरफान सय्यद ( महाराष्ट्र मजदूर संघटना)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button