breaking-newsमुंबई

मोनो पुन्हा धावणार!

  • दहा महिन्यांपासून बंद असलेली सेवा उद्यापासून सुरू; तिकीट दरांत बदल नाही

गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेली देशातील पहिली मोनो रेल्वे सेवा शनिवार, १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. चेंबूर ते वडाळा या पहिल्या टप्प्याच्या मार्गावर सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत मोनो पुन्हा धावणार आहे. मोनोच्या एका फेरीसाठी ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’कडून (एमएमआरडीए) कंत्राटदाराला पूर्वीपेक्षा वाढीव दर देण्यात येणार आहे. मात्र प्रवासी भाडय़ात वाढ न करण्याचा निर्णय ‘एमएमआरडीए’ प्रशासनाने घेतला आहे.

देशातील पहिली मोनो रेल्वे फेब्रुवारी २०१४ रोजी मुंबईतील चेंबूर ते वडाळा मार्गावर धावली. मात्र नोव्हेंबर २०१७ मध्ये म्हैसूर कॉलनी स्थानकात मोनोला आग लागली. या आगीत मोनोचे २५ कोटींचे नुकसान झाले. तेव्हापासून मोनोच्या पहिल्या टप्प्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. मोनो रेल्वेचे व्यवस्थापन पाहणाऱ्या ‘लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो-स्कोमी इंजिनिअरिंग’ (एलटीएसइ) या कंपनीसोबतच्या कंत्राटाचा कालावधी संपल्यानंतर ‘एमएमआरडीए’ने चार वेळा निविदा काढल्या होत्या. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर आता पुन्हा १ सप्टेंबरपासून मोनोची चेंबूर ते वडाळा ही मार्गिका सुरू होणार आहे.

मोनो रेल्वेचा हा टप्पा सुरू करताना प्रवासी भाडय़ामध्ये वाढ करण्याचा ‘एमएमआरडीए’ प्रशासनाचा विचार होता. मात्र प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन भाडय़ात वाढ करण्याचा निर्णय घ्यावा, असे एक सदस्यीय समितीने आपल्या अहवालात नमूद केले आहे. त्यानुसार प्रवासी भाडय़ात वाढ न करण्याचा निर्णय ‘एमएमआरडीए’ प्रशासनाने घेतला आहे.

कंत्राटदाराला वाढीव दर

तीन वर्षांचे कंत्राट संपुष्टात आल्याने ‘एलटीएसई’ने मोनोच्या एका फेरीसाठी १८०० रुपयांची मागणी ‘एमएमआरडीए’कडे केली होती. मात्र ‘एमएमआरडीए’ला ही मागणी मान्य नव्हती. त्यावर तोडगा काढण्यासाठी  मध्य रेल्वेचे माजी महाव्यवस्थापक सुबोध जैन यांची एक सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. कंत्राटदाराने मागितलेला फेरी दर हा आर्थिकदृष्टय़ा परवडणारा नाही. मात्र पूर्वीच्या प्रतिफेरी ४,६०० रुपये दरापेक्षा अधिक रक्कम कंत्राटदाराला देण्याची सूचना केली होती. त्यानुसार आता ‘एमएमआरडीए’ कंत्राटदाराला मोनोच्या एका फेरीमागे १०,६०० रुपये मोजणार आहे.

‘मोनो’गत!

* या मार्गावर १ सप्टेंबरपासून सकाळी ६ ते सायंकाळी १० या कालावधीत मोनो धावेल.

* दर १५ मिनिटांच्या अंतराने स्थानकांमध्ये मोनो दाखल होईल. तर दिवसभरात तिच्या १३० फेऱ्या होतील.

* वडाळा स्थानकामधून रात्री ९.५३ आणि चेंबूर स्थानकामधून रात्री १०.०८ मिनिटांनी शेवटची मोनो सुटेल.

‘दुसरा टप्पा कधी?’

पहिल्या टप्प्याची सेवा पूर्ववत होत असताना वडाळा ते सातरस्ता हा दुसरा टप्पा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी गुरुवारी राष्ट्रवादी काँंगेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या भागातील रहिवाशीदेखील दुसऱ्या टप्प्यासाठी आग्रही आहेत. दुसऱ्या टप्प्याची मार्गिका केईएम, टाटा, कस्तुरबा गांधी रुग्णालय तर वडाळा, करी रोड, लोअर परळ या रेल्वे स्थानकांना जोडते. त्यामुळे ही मार्गिका सुरू झाल्यास प्रवास करणे सोयीचे ठरेल, असे वडाळ्याचे रहिवाशी प्रकाश सावंत यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button