breaking-newsपिंपरी / चिंचवड

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा मनपा कार्यालयात कुत्री सोडून आंदोलन करणार

  • शिवसेनेचे संतोष सौंदणकर यांनी दिला इशारा
  • मनपा आयुक्त श्रावण हार्डीकर यांना दिले निवेदन  

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. चिंचवडमधील रस्टन कॉलनी, गुरुकृपा हौसिंग सोसायटी व एसकेएफ वसाहतीत मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी चिंचवड विधानसभेचे शिवसेना शहर संघटक तथा महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समिती, पुणे जिल्हा सदस्य संतोष सौंदणकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका पशु वैद्यकीय अधिकारी तसेच महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात सौंदणकर यांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, प्रभाग क्र. १८ चिंचवडगाव येथील रस्टन कॉलनी, गुरुकृपा हौसिंग सोसायटी व एसकेएफ वसाहतीत भटक्या मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे परिसरात राहणारे नागरिक, आबालवृद्ध, शालेय विद्यार्थी तसेच लहान मुलांना कधीही कुत्री चावण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. एखादी मोठी घटना घडण्याची वाट पाहण्यापेक्षा त्याआधी त्वरित उपाय योजना केल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सुटेल.

मागील तीन वर्षापूर्वी या भागातील नागरिकांनी तक्रार केल्यामुळे ज्या कुत्र्यांची शस्त्रक्रिया करुन त्यांना या भागात सोडले होते. त्याच कुत्र्यांनी पुन्हा पिल्ले जन्माला घातली आहेत. हा झाला संशोधनाचा विषय. परंतु, मी यात जाणार नाही. नागरिकांची सुरक्षा ही माझ्या दृष्टीने महत्वाची आहे. तरी, नागरिकांच्या सुरक्षेसाठी व कुत्री चावण्याचा संभाव्य धोका टाळण्यासाठी रस्टन कॉलनी, गुरुकृपा हौसिंग सोसायटी व एसकेएफ वसाहतीतील मोकाट फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त त्वरित करावा. त्यांची योग्य ती खात्रीशीर शस्त्रक्रिया करण्यात यावी. काही घटना घडल्यास शिवसेना स्टाईलने कुत्री आपल्या कार्यालयात सोडून आंदोलन केले जाईल, असा इशारा पत्रात सौंदणकर यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button