breaking-newsपुणेमहाराष्ट्र

मेट्रो मार्गिकेतील अतिक्रमणे हटवली

कामांमध्ये अडथळा ठरणाऱ्या स्टॉलवर कारवाई

शिवाजीनगर येथील प्रस्तावित मेट्रो मार्गिकेच्या कामामध्ये अडथळा ठरणाऱ्या अधिकृत स्टॉलवर तसेच अतिक्रमणांवर महापालिकेकडून शुक्रवारी कारवाई करण्यात आली. अधिकृत अठरा स्टॉल आणि चार हातगाडी व्यावसायिकांचे दळवी रुग्णालय ते प्राइड हॉटेल या दरम्यानच्या रस्त्यावर स्थलांतर करण्यात आले. यापुढे या मार्गिकेमध्ये व्यवसाय करताना आढळल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

महापालिकेचे शिवाजीनगर-घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील रेल्वे स्थानक, कांबळे पथ, नरवीर तानाजी वाडी, शिवाजीनगर बसस्थानक परिसरातील स्टॉल, हातगाडी आणि पथारी व्यावसायिकांवर शिवाजीनगर पोलीस आणि महापालिका यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

शिवाजीनगर येथील मेट्रो मार्गिकेचा काम सुरू करण्यात आले आहे. शिवाजीनगर रेल्वे स्थानक आणि बसस्थानक  रस्त्यावर वाहने थांबविणे, पार्क करण्यास वाहतूक पोलिसांनी बंदी घातली आहे. तसेच या रस्त्यांवर सर्व प्रकारच्या फेरीवाल्यांना मनाई करण्यात आली आहे. त्यानुसार या परिसरातील तीन स्टॉल, २९ हातगाडय़ा, १ रसवंती यंत्र, ७ लोखंडी काउंटर तसेच लोखंडी टेबल, खुच्र्या, स्टूल, बाकडी, रस्त्यावरील लोखंडी जाळ्या असे दहा ट्रक साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.

मेट्रो मार्गिकेतील अधिकृत अठरा स्टॉल आणि चार हातगाडय़ांचे स्थलांतर करण्यात आले असून त्यांना दळवी रुग्णालय ते प्राइड हॉटेल या दरम्यान जागा देण्यात आल्या आहेत. दरम्यान फेरीवाला व्यवसाय प्रमाणपत्रातील अटी-शर्तीचा भंग करणारे व्यावसायिक, स्वत: व्यवसाय न करणे, पोटभाडेकरू ठेवणे, मान्य जागेवर व्यवसाय न करणे, गॅस सिलिंडर-स्टोव्हचा वापर आदी प्रकरणी व्यावसायिकांचे परवाने आणि प्रमाणपत्र रद्द करण्यात येणार असून क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून ही कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

स्वारगेट परिसरातही कारवाई

स्वारगेट येथील मेट्रोच्या प्रस्तावित ट्रान्सपोर्ट हबसाठीही अतिक्रमण विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली. स्वारगेट परिसरातील जेधे चौकातील अतिक्रमणे या कारवाईमध्ये हटवून हा परिसर मोकळा करण्यात आला. मेट्रोच्या मागणीनुसार क्षेत्रीय कार्यालयाच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button