breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मुख्यमंत्री साहेब आता गाजरं नको, आश्वासने पूर्ण करणार का, ते सांगा?, विरोधकांचा सवाल

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – नागरिकांच्या जिव्हाळ्याची अनधिकृत बांधकामे, शास्ती कर, पवना जलवाहिनी, रिंग रोड हे प्रश्न सोडवून यातून नागरिकांची कायमची सुटका करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीअगोदर शहरात येऊन दिले होते. चार वर्षापूर्वी दिलेली ही आश्वासने केवळ गाजरं ठरली आहेत. आता मुख्यमंत्री साहेब आम्हाला गाजरं नको, तुम्ही स्वतः दिलेली आश्वासने पूर्ण करणार का?, ते सांगा, असा सवाल पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळी यांनी शुक्रवारी (दि. 2) पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.

आगामी लोकसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यासाठी मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघात भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या शुक्रवारी होणार आहे. त्यानिमित्त निगडी येथील मदनलाल धिंग्रा मैदानावर त्यांची सभा होणार असून या सभेत मुख्यमंत्री शहरातील नागरिकांना कोणते गाजर दाखविणार आहेत, याकडे विरोधकांचे लक्ष लागले आहे. त्या पाश्वभूमीवर पालिकेतील गटनेत्यांनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेत शहरातील प्रलंबित प्रश्नांवर पुन्हा एकदा प्रकाशझोत टाकला आहे.

मुख्यमंत्री साहेब बोलबच्चन करू नका

दत्ता साने म्हणाले की, मागील विधानसभा निवडणुकीत अनधिकृत बांधकामे, शास्ती कर, पवना जलवाहिनी, कचरा हे प्रश्न सोडविण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार यांना निवडून दिले. परंतु, यातील एकही प्रश्न गेल्या चार वर्षात सुटलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री साहेब आपण दिलेली आश्वासनं ही गाजरं ठरली आहेत. उद्या निगडीतील सभेत नागरिकांना कोणते गाजर दाखविणार आहात?, आम्हाला आता गाजरं नको, तुम्ही स्वतः शहरवासियांना दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, त्याचे उत्तर द्या, आम्हाला बोलबच्चन करू नका, असेही साने म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी पवना जलवाहिनीचा निर्णय घ्यावा

राहूल कलाटे म्हणाले की, गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. तरी देखील भाजपच्या नेत्यांनी पवना जलवाहिनीचा प्रश्न अद्याप सोडविला नाही. वास्तविकतः हरित लवादाने पवना जलवाहिनीवरील स्थगिती मागे घेतली. आता हा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अखत्यरित आहे. तरी देखील हा प्रकल्प मार्गी लागावा, यासाठी त्यांची इच्छाशक्ती दिसत नाही. त्यामुळेच त्यांनी याबाबतचा निर्णय घेतलेला नाही. पाण्यासाठी शहरातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शास्ती कर, अनधिकृत बांधकामे हे जुनेच प्रश्न सोडविले नसल्यामुळे नागरिकांना हे प्रश्न सुटण्याची अपेक्षा आता धूसर झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता तरी, नागरिकांना दिलेली आश्वासने तडीस न्याव्हीत.

नागरिक त्या पंधरा लाखांची वाट पाहत आहेत

सचिन चिखले म्हणाले की, घरगुती गॅसचे भाव वाढत चालल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोलमजुरी करून सरकारचीच भरती करावी लागत आहे. आता नागरिक पंतप्रधान मोदी यांच्याकडून 15 लाख रुपये बँक खात्यात कधी एकदा जमा होतात, याची वाट पाहत आहेत. त्यातच रिंगरोडमध्ये हजारो घरे पडणार आहेत. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये राहणा-या नागरिकांची अवस्था बिकट आहे. महागाईमुळे स्वतःच्या मुलीच्या लग्नाला देखील त्यांच्याकडे पैसे नाहीत. बँका सुध्दा त्यांना अर्थसहाय करण्यास तयार नाहीत, अशी परिस्थिती असल्याचेही चिखले म्हणाले.

उद्या मुख्यमंत्र्यांना खोटं बोलण्याची नामी संधी

प्रशांत शितोळे म्हणाले, शहराचा स्मार्ट सिटीत समावेश हा नागरिकांच्या रेट्यामुळे करण्याची नामुष्की भाजपवर आली. त्यांना नागरिकांची मते हवी होती म्हणून त्यांनी शहराचा समावेश केला. हा समावेश शहराच्या विकासासाठी नसून भाजपच्या विकासासाठी आहे. कारण, त्यांना पालिकेत भाजपची सत्ता आणायची होती. ती आणली. शहरात चोवीस तास पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा बोजवारा उडाला आहे. कोट्यवधी रुपयांचे काम गुंडाळण्याची वेळ येणार आहे. मागच्या निवडणुकांनंतर मुख्यमंत्र्यांनी शहरातल्या नागरिकांसाठी वेळच दिला नाही. बटनं दाबून विकास कामांची उद्घाटनं केली. आज सर्व लवाजमा गोळा करण्याचे काम हे उद्याच्या सभेसाठी आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गेल्या चार वर्षात दिलेले कोणते आश्वासन पूर्ण केले, त्यावर उद्याच्या सभेत बोलावे. नाहीतर, उद्याच्या सभेत सुध्दा मुख्यमंत्र्यांना खोटं बोलण्याची नामी संधी आहे.

 

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button