breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प

परवाना शुल्कांमध्ये वाढ होण्याची शक्यता

देशात लोकसभा निवडणुकीचे, तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या पाश्र्वभूमीवर मुंबई पालिकेचा २०१९-२० या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. पालिका आयुक्त अजोय मेहता सोमवारी स्थायी समितीच्या विशेष बैठकीत अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे आगामी वर्षांचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

शहरातून वाहतुकीला गती देण्यासाठी उभारण्यात येत असलेला सागरी किनारा मार्ग, पश्चिम आणि पूर्व उपनगरे जोडण्यासाठी प्रस्तावित गोरेगाव- मुलुंड लिंक रोड, पादचारी पूल – उड्डाणपूल – आकाशमार्गिकांची दुरुस्ती आदींसाठी  अर्थसंकल्पामध्ये भरीव तरदूत करण्यात येणार आहे. मात्र मोठे प्रकल्प आणि नागरी सुविधांसाठी निधीची कमतरता पडू नये यासाठी पालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या विविध परवान्यांच्या शुल्कात वाढ करण्यात येण्याची शक्यता आहे. तर अर्थसंकल्पात कचऱ्यावरही कर आकारण्याचा विचार प्रशासन पातळीवर सुरू आहे.

कर वसुलीवर लक्ष

मुंबईमधील कचरा आणि कचराभूमींचा प्रश्न सोडविण्यात पालिका अपयशी ठरल्यामुळे न्यायालयाने नव्या विकासकामांना प्रतिबंध केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवून दिलासा दिला होता. असे असले तरी गेल्या वर्षभरात पुनर्विकास प्रकल्पांच्या माध्यमातून पालिकेला मिळणारा महसूल घसरला आहे. तसेच जकात करही बंद झाला आहे. पालिकेने उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. आगामी वर्षांत मालमत्ता कराच्या वसुलीचे मोठे उद्दिट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. त्यासाठी मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या थकबाकीच्या वसुलीवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. पालिकेकडून दुकाने आणि आस्थापना, आरोग्य, फेरीवाला, चित्रीकीरण, महोत्सव, उद्योग, होर्डिग्ज, जाहिराती आदींसाठी परवाना देण्यात येतो. या परवाना शुल्कामध्ये काही अंशी वाढ करून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात करण्यात येण्याची शक्यता आहे. सध्या काही परवाना शुल्क अत्यंत नाममात्र आहेत. त्यात वाढ केल्यास महसुलात भर पडू शकेल, असे काही अधिकाऱ्यांचे मत आहे.

या तरतुदींची शक्यता

  • नरिमन पॉइंट ते कांदिवली दरम्यान सागरी किनारा मार्ग प्रकल्प उभारण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील नरिमन पॉइंट ते वांद्रे सागरीसेतूपर्यंतचा टप्पा उभारण्याची जबाबदारी पालिकेवर आहे. पालिकेने या कामाला सुरुवात केली असून प्रकल्पासाठी आगामी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात येणार आहे.
  • पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी गोरेगाव – मुलुंड लिंक रोड प्रकल्प प्रस्तावित असून या प्रकल्पासाठी काही परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पाचे काम पुढील वर्षांमध्ये सुरू करण्याचा पालिकेचा मानस असून त्यासाठी तरतूद करण्यात येणार आहे.
  • रस्ते, जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलणे, जलवितरण व्यवस्था बळकट करणे, घनकचरा व्यवस्थापन, कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करणे आदी विविध नागरी कामांसाठी तरतूद करण्यात येणार आहे.
  • अर्थसंकल्पात भांडवली कामांसाठीचा खर्च साधारण १० हजार कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
  • शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद होण्याची शक्यता आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button