breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईसह इतर शहरांसाठी येते ४८ तास धोक्याचे; हवामान खात्याचा इशारा

मुंबईसह इतर शहरामध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय. दादर, कुर्ला, सायन, मुलुंड, माटुंगा, हिंदमाता, अंधेरी, घाटकोपर, गोरेगाव, मालाड, जोगेश्वरी, कांदिवली, बोरिवली, गोवंडी या भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. अजूनही या भागात पावसाचा जोर कायम असल्यानं मुंबईतील सखल भाग पाण्याने भरून गेले आहेत. मुंबईतील दादर हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, माटुंगा, अंधेरी सबवे आणि कुर्ला परिसर जलमय झाला आहे. हिंदमातामध्ये तर दोन ते तीन फूट पाणी भरल्याने येथील वाहतूक कोंडी झाली आहे. हिंदमाता येते तर वाहनांमध्ये पाणी शिरल्याने वाहने बंद पडली आहेत. हिंदमातामध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन पंपाद्वारे पाणी काढण्यास सुरुवात केली आहे.


रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरले आहे. घरांमध्ये पाणी शिरल्याने मुंबईकरांना रात्रभर जागून काढावी लागली आहे. तसेच रेल्वे रुळावरही पाणी साचल्याने त्याचा अत्यावश्यक सेवेतील कामगारांना मोठा फटका बसला आहे. रेल्वे रुळावर पाणी साचल्याने पश्चिम आणि हार्बर रेल्वे पूर्णपणे ठप्प झाली आहे. कुर्ला आणि सीएसएमटी दरम्यानची हार्बर रेल्वे बंद झाली आहे. तर मध्य रेल्वेवरील वाहतूक अत्यंत धीम्यागतीने सुरू आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कामगारांचे हाल झाले आहेत. पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने बेस्टनेही वाहतुकीचे आठ मार्ग बदलले आहेत


कांदिवलीत तर पश्चिम द्रुतगती मार्गावर आज सकाळी एका कार समोर डोंगराचा भाग कोसळला आणि विजेचा खांबही कोसळला. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी झाली. तसेच प्रचंड प्रमाणात मातीचा ढिगारा आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील मीरारोडहून मुंबईकडे येणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, मुंबईहून मीरारोडकडे जाणारा मार्ग सुरू आहे. दरम्यान, एक मार्गिका बंद असल्याने मुंबईकडे येणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. पश्चिम द्रुतगती मार्गावर डोंगराचा भाग कोसळल्याचं माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मातीचा ढिगारा आणि उन्मळून पडलेले वृक्ष बाजूला करण्यास सुरुवात केली आहे. दोन ते तीन तासात हे काम पूर्ण होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.


मुंबईतील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. घराघरांमध्ये पाणी शिरले असून वृक्षही उन्मळून पडले आहेत. यापार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने मुंबईकरांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. महापालिका क्षेत्रात काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाच्या व भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे. त्याचबरोबर नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घरीच राहावे, असेही आवाहन पालिकेनं केलं आहे.


मुंबईप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूरमध्ये पावसाने जोर धरला. ठाण्यात घोडबंदर येथे पाणी साचल्याने या भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. त्यातच या भागात मेट्रोचं काम सुरू असल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडली आहे.


येत्या ४८ तासात मुंबईसह ठाण्यात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने रेड अॅलर्ट जारी केला असून नागरिकांना कारण नसताना घराच्याबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. तसेच मच्छिमारांनाही समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button