breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मुंबईमध्ये आजपासून १० टक्के पाणीकपात

सरत्या पावसाने दगा दिल्याने धरणे तुडूंब भरूनही गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाणीसाठा उपलब्ध असल्याने गुरूवारपासून मुंबईत दहा टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा, मोडकसागर, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा या सर्व धरण क्षेत्रांमध्ये यंदा कमी प्रमाणात पाऊस पडल्याने तब्बल दोन लाख दशलक्ष लिटर एवढा पाणी साठा कमी झाला आहे. १ नोव्हेंबर रोजी घेतलेल्या आढाव्यामध्ये हा पाणीसाठा १५ टक्के एवढा कमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे वर्षभराची पाण्याची तजवीज करण्यासाठी महापालिकेने अखेर १५ टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत निवेदन सादर करण्यात आले होते. परंतु केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्या निधनामुळे शोकप्रस्ताव सादर करण्यात आल्याने हे निवेदन विचारात घेण्यात आले नाही.

१ नोव्हेंबर २०१८ ते ३१ जुलै २०१९ पर्यंत एकूण २९३ दिवस असून वैतरणा तलाव क्षेत्रात २४२ दिवस तर भातसा तलाव क्षेत्रात २०९ दिवस पुरेल एवढे पाणी साठा आहे. उर्वरित दिवसांसाठी राखीव साठय़ातून पाणी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे राखीव पाणी साठय़ाच्या कमीत कमी वापर व्हावा यासाठी सरसकट १० टक्के पाणी कपात सुचवण्यात येत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. ही १० टक्के पाणी कपात लागू केल्यास पुरवठय़ाच्या वेळेत १५ टक्के कपात करण्यात येईल, असे जलअभियंता विभागाने स्पष्ट केले आहे. ही कपात निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना लागू राहिल, असे आयुक्त अजोय मेहता यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

नवीन जलजोडणी नाही

मुंबईकरांवर लागू केलेले निवेदन स्थायी समितीत माहितीसाठी सादर करण्यात आले होते. परंतु ते बुधवारी झालेल्या सभेत विचारात घेतले नसले तरी आयुक्तांच्या सूचनेनुसार ही कपात गुरुवारपासून लागू होत आहे. पाणी कपातीमुळे अतिरिक्त जलजोडणी किंवा जलजोडणीचा आकार वाढवण्यात येणार नसल्याचे जल अभियंत्यांनी स्पष्ट केले आहे.

ठाणे, भिवंडीच्या पाण्यातही कपात

मुंबई महापालिकेच्यावतीने विविध धरणातुन पुरवठा होणाऱ्या पाण्यापैकी १५० दशलक्ष लिटर एवढा पाणी पुरवठा ठाणे आणि भिवंडी महापालिकांना करण्यात  येतो. या पाणी पुरवठय़ातही १० टक्के पाणीकपात केली जाणार असल्याचे जलअभियंता विभागाने स्पष्ट केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button