breaking-newsमुंबई

मुंबईतील सामना ३६ विरुद्ध शून्य जिंकण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार

  • विधानसभेच्या सर्व ३६ जागांवर युतीच्या विजयाचा संकल्प

मुंबई : लोकसभा निवडणुकीत मुंबईतील मतदारांनी युतीला सर्व जागांवर विजयी केले. आता विधानसभा निवडणुकीतही त्याचीच पुनरावृत्ती घडवत मुंबईतील सामना युतीला ३६ विरुद्ध शून्य असा जिंकायचा आहे, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई भाजपच्या मुख्यालयात व्यक्त केला.

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी आमदार मंगलप्रभात लोढा यांची नियुक्ती झाल्यानंतर शुक्रवारी त्यांच्या पदग्रहणाचा कार्यक्रम दादर येथील वसंतस्मृती या मुंबई भाजपच्या मुख्यालयात झाला. त्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. मुंबई भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री आशीष शेलार, प्रदेश भाजपचे संघटनमंत्री विजय पुराणिक, मुंबईचे संघटनमंत्री सुनील कर्जतकर, माजी खासदार किरीट सोमय्या आदी यावेळी उपस्थित होते.

मावळते शहर अध्यक्ष आशीष शेलार यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसह आतापर्यंतच्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत केलेल्या कामांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले.

मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा हे संवेदनशील नेता म्हणून ओळखले जातात. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीसह आतापर्यंत पक्षाने दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या लोढा यांनी यशस्वीरीत्या सांभाळल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीतही ते पक्षाला चांगले यश मिळवून देतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई अध्यक्ष म्हणून केलेल्या पहिल्याच भाषणात बांगलादेशी घुसखोरांच्या लोंढय़ांवर हल्ला चढवला. भारतात राहताना येथील नियमांचे पालन करूनच राहावे लागेल, असे त्यांनी बजावले.

पक्षाने दिलेल्या जबाबदारीचे पालन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू आणि मुंबई कॉंग्रेसमुक्त करण्याचे पक्षाचे स्वप्न साकार करण्यासाठी काम करू, अशी ग्वाही लोढा यांनी दिली.

धोकादायक इमारतींचा सक्तीने पुनर्विकास

पूर्वीच्या सरकारने मुंबई आणि त्यात जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने इमारत पडून मुंबईकरांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींमधील रहिवाशांच्या वित्त-जीविताचे रक्षण व्हावे यासाठी धोरणात्मक अडथळे दूर करून अशा इमारतींचा सक्तीने पुनर्विकास करण्यासाठी कायद्यात तरतूद करणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. आपल्या सरकारने मुंबईकरांसाठी विकासकामांचा झपाटा लावला असून पुढील काही वर्षांत या शहराचा चेहरामोहरा बदलून जाईल. विकासाचे मुंबई मॉडेल दिसेल, असे फडणवीस यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button