breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

मावळ लोकसभा, संजय राऊतांच्या शिष्टाईनंतरही जगताप- बारणेंतील वाद कायम

पिंपरी ( महा ई न्यूज ) – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणेंच्या अडचणी कायम आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि श्रीरंग बारणे यांच्याशी दिलजमाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही शिष्टाई फळाला आली नाही. जगताप यांनी बारणेंचे काम करण्यास नकार दिल्याचे कळते. त्यामुळे मावळातील शिवसेनेचा उमेदवार धोक्यात राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांचे मात्र आयतेच फावणार आहे.

मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपचे चिंचवडमधील आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील वाद मागील १० वर्षापासून कायम आहे. आता भाजप-शिवसेना युती झाल्यानंतर जगताप युतीचा प्रचार करताना दिसत नाहीत. याबाबत शिवसेना नेत्या नीलम गो-हे यांनीही काही दिवसापूर्वी आमदार जगताप यांच्याशी चर्चा केली होती. मात्र, जगताप ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यानंतर बारणेंनी थेट खासदार संजय राऊत यांना लक्ष घालण्याची विनंती केली.

त्यानुसार संजय राऊत शनिवारी पिंपरी-चिंचवड शहरात आले. वाकडमधील एका बड्या हॉटेलात आमदार जगताप यांना बोलवून बारणेंसोबतचे वाद मिटविण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी नीलम गो-हे या सुद्धा उपस्थित होत्या. मात्र, जगताप यांनी बारणेंच्या तक्रारीचा पाढा राऊतांसमोर मांडला. माझ्यावर त्यांनी वेळोवेळी आरोप केले. मी शिवसेनेचा उमेदवार बदला, असे सांगितले होते. अजूनही उमेदवार बदला मी शिवसेनेचा उमेदवार निवडून आणतो अशी आक्रमक भूमिका जगताप यांनी कायम ठेवली. जगताप काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे लक्षात येताच राऊत यांनी तेथून काढता पाय घेतला.

भाजप आमदार जगताप यांनी प्रथम मावळची जागा भाजपला सोडावी यासाठी हट्ट धरला. मात्र, राज्याच्या व्यापक हितासाठी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेसमोर नमते घेत २०१४ साली शिवसेनेने जिंकलेल्या सर्व जागा त्यांना देण्याचा निर्णय घेतला. शिवाय पालघरची एक वाढीव जागाही देऊन टाकली. यामुळे मात्र, जगताप यांचा हिरमोड झाला. २०१४ साली त्यांनी शेकाप-मनसेच्या मदतीने अपक्ष लोकसभा लढवून बारणेंना पराभूत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोदी लाटेत बारणेंनी दीड लाखांनी विजय मिळवला. मात्र, त्या पराभवाचा बदला घेण्याचा जगताप यांचा पन कायम आहे.

भाजप आमदार जगताप यांनी मधल्या काळात नीलम गो-हे यांच्या मध्यस्थीने आपले बंधू शंकर जगताप यांना शिवसेनेची उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, जगतापांची सत्तेसाठी खोबरे तिकडे चांगभले ही वृत्ती असल्याने सेनेने बारणेंनाच संधी दिली. जगताप हे आज भाजपमध्ये असले तरी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी त्यांची छुती सलगी असल्याचे बोलले जाते. अजित पवार जगतापांविरोधात बोलत नाहीत आणि जगताप हे पवार कुटुंबियांबाबत काहीही बोलताना दिसत नाहीत. त्यामुळे जगताप यांचा बारणे विरोध हा पार्थ पवार यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी तर नाही ना याची चर्चा पिंपरी-चिंचवड परिसरात सुरू आहे. भाजपनेही आमदार जगताप यांच्याकडे दुर्लक्ष करणे पसंत केले आहे. अर्थात याचा फटका भविष्यात जगताप यांना बसण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button