breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

माथाडी पतसंस्थाच्या कपातीचा आदेश रद्द करा

कामगार नेते इरफान सय्यद यांची ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे मागणी

पिंपरी |महाईन्यूज |प्रतिनिधी|

तत्कालीन भाजप सरकारच्या राजवटीत माथाडी पतसंस्था मोडीत काढण्याच्या दृष्टीने पतसंस्थांच्या कपातीचा कामगार विभागाने काढलेला आदेश मागे घेण्यात यावा. माथाडी कामगार कायदा सक्षमपणे राबविण्यात यावा. कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची विनंती महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष, भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष, कामगार नेते इरफान सय्यद यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना केली आहे. पवार यांनी याबाबत सरकारला सूचना दिल्या जातील असे आश्वासन दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची पुण्यात महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन पवार यांना दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद, सल्लागार बाळासाहेब शिंदे, कार्याध्यक्ष परेश मोरे उपस्थित होते.

माथाडी कामगारांना आर्थिक पाठबळ मिळावे याकरिता माथाडी कामगारांनी कामगारांकरिता पतसंस्था स्थापन केली. मात्र, तत्कालीन भाजप सरकारमधील कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी माथाडी पतसंस्था मोडीत काढण्याच्या दृष्टीने एक शासन निर्णय घेतला आहे. हा निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा. माथाडी कामगारांकरिता कार्यरत असणा-या पतपेढीतून दिल्या जाणा-या कर्जाच्या हत्प्त्याची कपात ही पूर्वीप्रमाणेच माथाडी मंडळाकडून करण्यात यावी.

माथाडी कामगारांसाठी असलेला माथाडी कायद्याची सक्षमपणे अंमलबजावणी करावी. मागील भाजप सरकारच्या काळात माथाडी कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. राज्यातील सरकार बदलण्यात कामगार वर्गांचा मोठा हातभार आहे. आता ‘महाविकासआघाडी’ सरकारकडून कामगारांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. मागील पाच वर्षांपासून कामगारांचे प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावावेत. यामध्ये आपण स्वत: लक्ष घालावे. सरकारला तशा सूचना द्याव्यात, अशी विनंती इरफान सय्यद यांनी पवार यांना केली आहे.

पवार साहेबांना माथाडी कामगारांच्या प्रश्नांची चांगली जाण आहे. त्यांनीच माथाडी कायदा सक्षम केला. त्यामुळे त्यांनी माथाडी कामगारांच्या समस्या समजावून तत्काळ मागण्यांची दखल घेत कामगारांच्या प्रश्नांबाबत सरकारला अवगत केले जाईल. तशा सूचना दिल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे सय्यद यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button