breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

माऊलींच्या 723 व्या संजीवन समाधी सोहळ्यास प्रारंभ

आळंदी  – संत ज्ञानेश्‍वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्याचे जनक गुरुवर्य हैबतबाबांच्या पायरी पूजनाने संत ज्ञानेश्‍वर महाराज माऊलींच्या 723 व्या संजीवन समाधी सोहळ्यास शुक्रवार (दि.30) पासून प्रारंभ झाला. पंढरपूरमधील संत नामदेव पायरीप्रमाणेच आळंदीत माउली चरणी हैबतबाबा यांची पायरी असून त्यांच्या परंपरागत पायरी पूजनाने सोहळ्याला प्रारंभ होत असतो. 

पहाटे पवमान अभिषेक व दुधआरती, सकाळी भाविकांच्या महापूजा हे नित्य कार्यक्रम उरकल्यानंतर सकाळी दहा वाजता मुख्य महाद्वारासमोर असलेल्या हैबतबाबांच्या पायरीचे पूजन विधीवत मंत्रोपचार करत हैबतबाबांचे वंशज पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर- पवार, राजेंद्र आरफळकर व समस्त आरफळकर कुटुंबीय, संस्थानचे प्रमुख विश्‍वस्त अ‍ॅड. विकास ढगे पाटील, विश्‍वस्त अभय टिळक, डॉ. अजित कुलकर्णी यांचे हस्ते पायरीचे पूजन करण्यात आले. मंत्रोपचार व धार्मिक विधी श्रीनिवास कुलकर्णी, श्रीरंग कुलकर्णी या ब्रह्मवृंदानी केले.  यावेळी माउलींचे चोपदार ह.भ.प. कृष्णराव चोपदार, आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र चौधर, पोलिस निरीक्षक प्रकाश जाधव, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, संस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर वीर, श्रीधर सरनाईक, नगरसेवक संतोष गावडे, आळंदीकर ग्रामस्थ, भाविक वारकरी उपस्थित होते.

रात्री  धूप आरती व तद्नंतर ह.भ.प. योगीराज ठाकूर, ह.भ.प. बाबासाहेब आजरेकर यांच्यातर्फे कीर्तनसेवा, रात्री 10 ते पहाटे 4 पर्यंत हैबतबाबा पायरीसमोर ह.भ.प. वासकर महाराज, ह.भ.प. मारुतीबुवा कराडकर, ह.भ.प. हैबतबाबा आरफळकर यांच्यातर्फे हरिजागर आदी धार्मिक कार्यक्रमांनी सोहळ्याच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली. शनिवारी (दि.01) पहाटे पवमान अभिषेक व दुधआरती, भाविकांच्या महापूजा, दुपारी महानैवेद्य, सायंकाळी ह.भ.प. बाबासाहेब देहूकर यांच्यातर्फे कीर्तनसेवा, रात्री धूप आरती व तद्नंतर सायंकाळी  9.00 ते 11 ह.भ.प. वासकर महाराज यांच्यातर्फे कीर्तनसेवा असे कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान शेकडो दिंड्या आळंदीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या असून शहरातील रस्ते वारकर्‍यांच्या गर्दीने फुलले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button