breaking-newsमहाराष्ट्र

महाराष्ट्र काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष मिळाला पण नेतृत्वासाठी पक्ष उरलाय?-शिवसेना

महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडल्यानंतर सुमारे महिनाभर महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कोण? यावर खल सुरु होता. तो पेच अखेर सुटला आहे. मात्र बाळासाहेब थोरात यांच्या नियुक्तीनंतर आता शिवसेनेने या निर्णयावर टीका केली आहे. काँग्रेसने महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून बाळासाहेब थोरात यांची निवड केली खरी पण नेतृत्व करायला पक्ष उरलाय का? असा प्रश्न सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.

काय म्हटले आहे अग्रलेखात?
काँग्रेस पक्षाला अद्यापि राष्ट्रीय अध्यक्ष मिळालेला नाही, पण महाराष्ट्राला मात्र अखेर नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे. अशोक चव्हाण यांच्या रिकाम्या जागी बाळासाहेब थोरात यांची नेमणूक करण्यात आली आहे. चव्हाण गेले व थोरात आले. अर्थात त्यामुळे असा काय फरक पडणार आहे? काँग्रेसचे आभाळ फाटून पार जमीनदोस्त झाले आहे. पक्ष जमिनीवर शिल्लक नाही. ज्यांनी वर्षानुवर्षे काँग्रेसची वतनदारी केली, सर्वोच्च पदे मिळवली असे सर्व प्रमुख लोक महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात काँग्रेसचा त्याग करीत आहेत. महाराष्ट्रातही वेगळे काही घडताना दिसत नाही. काँग्रेस हा राजकीय पक्ष नसून विचार आणि संस्कृती आहे असे सतत सांगितले जाते. हा विचार, संस्कृती आणि बरेच काही भाजप किंवा शिवसेनेत रोजच विलीन होताना दिसत आहे. काँग्रेसला राजकीय भविष्य उरलेले नाही. त्यामुळे या ओसाड वाडय़ात आता कोणते विचार, कोणत्या संस्कृतीचे रोपटे लागणार हा विचार अनेकांनी केला आणि या वाडय़ातून काढता पाय घेतला. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे विधानसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते भाजपात विलीन झाले, त्याचप्रमाणे गोवा विधानसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते १० आमदारांसह भाजपात विरघळून गेले आहेत. राज्यात हीच अवस्था आहे. या अवस्थेतून काँग्रेसला बाहेर काढण्याचे आव्हान बाळासाहेब थोरातांवर आहे.

राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देताच बुडत्या जहाजातून अनेकांनी उड्या मारल्या. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांनीही ‘त्यागपत्र’ दिले. काँग्रेस पक्षात ‘त्याग’ शब्दाशी संबंध असलेले कोणी उरले आहे काय? हा प्रश्नच आहे. सत्ताधारी म्हणून सोडाच, पण विरोधी पक्ष म्हणून तरी काँग्रेसने धड जबाबदारी पार पाडली आहे असे दिसत नाही. राहुल गांधी यांच्या रिकाम्या जागी काँग्रेसला ‘नगास नग’ तर मिळालेला नाहीच, पण महाराष्ट्रातही अशोक चव्हाण यांनी राजीनामा देऊन महिना उलटून गेला तरी नवा प्रदेशाध्यक्ष मिळत नव्हता. अखेर आता त्या पदावर बाळासाहेब थोरात विराजमान झाले, पण त्यांच्या दिमतीला महाराष्ट्रात ‘जात’निहाय पाच कार्याध्यक्षही पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. म्हणजे महाराष्ट्रात काँग्रेसने एक नव्हे, तर सहा अध्यक्ष नेमले आहेत. काँग्रेसच्या डोक्यातील जात व धर्माचे खूळ काही जात नाही. विदर्भातील नितीन राऊत (अनुसूचित जाती), विदर्भाच्याच यशोमती ठाकूर (इतर मागासवर्गीय), मुजफ्फर हुसेन (मुस्लिम), विश्वजित कदम (मराठा), बसवराज पाटील (लिंगायत) अशी ही जात पंचायत काँग्रेसने नेमली असली तरी लोकसभा निवडणुकीत त्यापैकी एकही समाज काँग्रेसच्या मागे उभा राहिलेला दिसत नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button