breaking-newsपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये आरटीएफसीआर स्वॅब टेस्टींग लॅब चे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्याहस्ते उद्घाटन

पिंपरी | पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोरोना संशयितांच्या तपासणीकरीता महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आज दि. ०७ जुलै २०२० रोजी स. १०.२० वा. आरटीएफसीआर स्वॅब टेस्टींग लॅबचे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक योगेश बहल, नगरसेविका सुजाता पालांडे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, वायसीएम रुग्णालय अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळे, डॉ. प्रविण सोनी, डॉ. सतिश पाटील, डॉ. मोकाशी इ. उपस्थित होते. गेल्या आठवड्यात स्वॅब टेस्टींग लॅबकरीता आयसीएमआरची मान्यता मिळालेली होती. त्या माध्यमातुन दररोज ३५० ते ४०० स्वॅब टेस्टींग होणार आहेत. यामुळे संशयित कोरोना रुग्णांचा तपासणी अहवाल प्रलंबित न राहता जलद गतीने प्राप्त होण्यास मदत होईल अशी माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली.
त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे ॲन्टिजेन किट उपलब्ध झाले असुन याद्वारे सुमारे एक लाख कोरोनाची लक्षणे असणारे तसेच कोरोबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी होणार आहे. अवघ्या पंचवीस ते तीस मिनिटात या संशयितांना कोरोनाची लागण झालेली आहे कि नाही याची माहिती मिळणार असून कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अशा संशयितांची स्वॅबद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. कोरोनाच्या रुग्णांची रोजची वाढती संख्या लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णांच्या चाचण्या कमीत कमी वेळात आणि कमीत कमी खर्चात होण्यासाठी या नव्या अतिजलद चाचणी पद्धतीत रुग्णाच्या घशातील किंवा नाकातील स्त्रावाचं परीक्षण केलं जाणार आहे. या अतिविशिष्ट किटद्वारे रुग्णांच निदान १५ ते ३० मिनिटांत होऊन रुग्णाचा अहवाल मिळणार आहे.
महापालिकेचे फ्रन्टलाईन कर्मचारी, कंटेन्मेंट झोन, हॉटस्पॉट मधील भाजी विक्रेते, रेशनिंग दुकानदार तसेच ज्या व्यक्तींना अतिजोखमीचे आजार आहेत उदा. मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, फुफ्फुसे-यकृत-मूत्रपिंडे अशा अवयवांचे दीर्घकालीन गंभीर आजार, गरोदर स्त्रिया, वयोवृद्ध व्यक्ती, एचआयव्ही बाधित, कर्करोगाची केमोथेरपी घेणारे, अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्ती, ज्या व्यक्तींना सर्दी, खोकला, ताप, दम लागणे अशी फ्लूसदृश लक्षणं आहेत अशा व्यक्तीं तसेच जे रुग्ण कोरोना विषाणूच्या आजारानं बाधित आहेत अशांच्या जवळच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची या किटद्वारे चाचणी करण्यासाठी वापर करण्यात येणार आहे. महापालिकेची सर्व झोनल रुग्णालये या ठिकाणी उद्यापासुन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली जलद निदान करण्यासाठी याचा वापर करणेत येणार असुन अँटिजेन टेस्टिंग रुग्णांना वरदानच ठरणार आहे. जलद गतीनं होणाऱ्या चाचण्यांमुळे अधिकाधिक रुग्णांचं निदान होईल. बाधित रुग्णांची संख्या कदाचित सुरुवातीला जास्त असेल; पण आजाराच्या सुरुवातीलाच निदान झाल्यामुळे रुग्ण गंभीर होण्याचं प्रमाण आणि ते मृत्युमुखी पडण्याची संख्या मर्यादित होईल. कोरोना विषाणूची महासाथ नियंत्रणात येण्याच्या दृष्टीनं एक पाऊल पुढं पडेल, अशी आशा महापौर उषा उर्फ माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button