breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मंत्रीपदाचे दिवास्वप्न: पालकमंत्री पदासाठी इच्छुक आमदारांच्या हातावर ‘तुरी’

  • इच्छुक आमदारांची झाली घोर निराशा
  • अपेक्षाभंग होण्याचे मिळाले संकेत

– Amol Shitre

पिंपरी, (महाईन्यूज) – पुणे जिल्ह्यातील निष्ठावंतांसह संलग्न आमदारांची भाजपात अत्यंत बिकट अवस्था झाल्याचे दिसते. जिल्ह्याशी निगडीत पदांचे दावेदार असताना आपली कुठेच गणती होत नसल्याने पक्षनेतृत्वाबाबत त्यांच्यात नाराजीचा सुर आहे. पक्षात आपले काही चालत नसल्यामुळे मनातील कटू भावना धड ‘बोलून दाखविता येईना आणि शांतही बसता येईना’, अशी अवस्था आमदारांची झाली आहे. भाजपात अख्खी हयात घालविणारे आमदार पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक असताना त्यांच्यावर पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांना लादले. स्वतःला ज्येष्ठ श्रेष्ठ समजणा-या पुण्यातील नेत्याच्या तालावर पक्षनेतृत्व नाचत असल्यामुळे आमदारांवर ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्या’ची वेळ आली आहे.

पुणे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेले एकूण बारा आमदार आहेत. भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे याला अपवाद ठरत असले तरी ते आता भाजपशी संलग्न म्हणूनच काम करतात. त्यापैकी 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर आमदार गिरीश बापट यांना राज्य मंत्रीमंडळातील अन्न व नागरी पुरवठा मंत्री पदासोबत पालकमंत्री पदही देण्यात आले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदार संघातून त्यांचा विजय झाल्यानंतर त्यांना आमदाराकीचा राजीनामा द्यावा लागला. त्यासोबत त्यांच्याकडून दोन्ही पदाचा राजीनामा घेण्यात आला. त्यानंतर पुण्याचे पालकमंत्री पद रिक्त झाले. या पदासाठी भाजपच्या इच्छुकांमध्ये रस्सीखेच स्पर्धा लागली. आमदारकीच्या तीन-तीन टर्म गाजवलेल्या भाजपच्या निष्ठावंतांनी आपापल्या मर्जीतील मंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फिल्डींग लावली होती.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार बाळा भेडगे, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, भीमराव तापकीर यांना मंत्रीपदाचा 2014 मध्ये शब्द दिला होता. पहिल्या मंत्री मंडळ विस्तारात यातील एकाचेही नाव मंत्री पदासाठी समोर आले नाही. त्यात पालकमंत्री पदावर तरी संधी मिळेल, याची अपेक्षा या आमदारांना लागली होती. आमदार भेगडे आणि तापकीर रेसमध्ये होते. आमदार जगताप आणि लांडगे यांना देखील पदाची आपेक्षा होती. मात्र, सर्वांच्याच हातावर तुरी देऊन मुख्यमंत्र्यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना पुण्याचे पालकमंत्री पद देऊन पुण्याच्या आमदारांवर आयात पालकमंत्री लादला आहे. पुण्यातील स्वतःला ज्येष्ठ आणि श्रेष्ठ समजणारे नेते कानाला लागत असल्यामुळे मुख्यमंत्री स्थानिकांना डावलतात की काय, अशा प्रश्न निर्माण झाला आहे. पक्षनेतृत्वाबाबत ‘मनात दाटून आलेला रोष धड व्यक्तही करता येईना आणि पचवताही येईना’, अशी अवस्था आमदारांची झाली आहे.

पवारांना विरोध तर पाटलांना का नाही?

2014 पूर्वी राज्यात महाआघाडीची सत्ता होती. त्यावेळी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहुकुमी सत्ता होती. त्यावेळी पुण्याचे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे होते. त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसह जिल्ह्याचा कारभार सुरळीत चालत होता. त्यावेळी पुण्यातील आमदारांनी बारामतीचा आयात पालकमंत्री आमच्यावर लादल्याची गरळ ओकली होती. प्रचंड नाराजी निर्माण झाल्याचे वातावरण तयार करून पवार यांच्याविरोधात नारेबाजी झाली होती. मात्र, आज खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांचा पुण्याशी कसलाही संबंध नसताना त्यांना पालकमंत्रीपद बहाल करून स्थानिक इच्छुकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. याबाबत नारेबाजी तर सोडाच, चक्कार शब्द देखील विरोधात बोलण्याचे धाडस कोणी दाखवत नसल्याचे चित्र आहे. अजित पवार यांना विरोध केला. मग आता चंद्रकांत पाटील यांना विरोध का केला जात नाही, असा सवाल राष्ट्रवादीचे पदाधिकारी विचारू लागले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button