breaking-newsपिंपरी / चिंचवड

मंचरला मुस्लिम समाजाकडून मराठा क्रांती मोर्चावर पुष्पवृष्टी

मंचर –  मराठा क्रांती मोर्चाने आयोजित केलेल्या बंदला मंचर शहरात 100 टक्के प्रतिसाद मिळाला. राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सुनील बांगर यांच्या नेतुत्त्वाखाली मंचर शहरातून काढण्यात आलेल्या मोर्च्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिय्या आंदोलनात विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी भाग घेतला. मुस्लिम समाजाच्या वतीने मोर्चावर पुष्पवृष्टी करण्यात आली. मोर्चाचे स्वागत मुस्लिम, जैन व दलित समाजाने केले.

मंचर बाजार समितीच्या आवारात आंदोलक जमले होते. तेथे किरण महाजन यांनी  राजमाता जिजाऊ यांना वंदना केल्यानंतर मोर्चाला सुरवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा केलेले बाजीराव महराज बांगर घोड्यावर स्वार झाले होते. समवेत तीन बाल शिवाजी होते. आंदोलकांच्या भावना तीव्र होत्या. शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, सरपंच दत्ता गांजाळे, वसंतराव बाणखेले, अरुणा दत्तात्रय थोरात, अरुण गिरे, सुनील बाणखेले, डॉ. दिपाली मांढरे, डॉ. सीमा खिवंसरा, डॉ. दत्ता चासकर, राजाराम बाणखेले, सरपंच अंकुश लांडे, उपसरपंच महेश थोरात, सुहास बाणखेले, युवराज बाणखेले, मोहन गावडे, संतोष बाणखेले, आदी मोर्चात सहभागी होते. कात्रज डेअरी व मुस्लीम समाजाच्या वतीने आंदोलकांना पाण्याच्या बाटल्या व बिस्कीट वाटप करण्यात आले.

संपूर्ण शहरातून आंदोलक शिवाजी चौकात आले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अॅड. बांगर व अजय घुले यांनी पुष्पहार आर्पण केला. व्यासपीठावर शाहिरांनी सादर केलेल्या ‘मराठा आरक्षण वाऱ्यावर, मराठा समाज उतरला रस्त्यावर’ पोवाड्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. अँड. बांगर यांनी सरकारवर हल्ला चढविला. ते म्हणाले, “मराठा समाज एकवटला आहे. अनेक मोर्चे काढले पण शासन वेळकाढूपणा करत आहे. लवकर आरक्षणाचा निर्णय घ्या. अन्यथा कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याची जबाबदारी राज्य सरकारवर राहील.’’

यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचे आगमन झाल्यानंतर ते स्वतः तसेच पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पुणे जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी ठिय्या आंदोलनात बैठक मांडली. सांगता प्रसंगी पाच मुली व बालशिवबांनी दिलीप वळसे पाटील व प्रांत अजित देशमुख यांना मागण्यांचे निवेदन दिले. पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव व देशमुख यांनी आंदोलन शांतेतेने पार पाडल्याबद्दल आंदोलकांचे अभिनंदन केले. प्रभाकर बांगर यांनी राष्ट्रगीत सादर केल्यानंतर सांगता झाली. वसंतराव बाणखेले, प्रवीण मोरडे, सुरेश निघोट, श्रीराम बांगर, शंकर धरम, राजू इनामदार, वैभव पोखरकर यांनी आंदोलनाची व्यवस्था पहिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button