breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजप कार्यकर्त्यांनी घरोघरी कोरोनावर जनजागृती करावी – चंद्रकात पाटील

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याची लक्षणे दिसत आहेत. शाळा व महाविद्यालयांना सुट्टी तसेच मॉल बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. ही सर्व परिस्थिती पाहून शहरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुढे यावे. सामाजिक उत्तरदायित्व समजून सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात कोरोना आजाराविषयी जनजागृती करावी. या आजाराला न घाबरता तो होऊ नये यासाठी काय काळजी घेतली पाहिजे याची माहिती नागरिकांना द्यावी, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (दि. १५) पिंपरी-चिंचवडमधील कार्यकर्त्यांना केले. तसेच शहरातील नागरिकांना पक्षामार्फत मास्क आणि सॅनिटायझर वाटप करण्याविषयी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर त्यांनी जबाबदारी निश्चित केली.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी-चिंचवडमधील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आकुर्डी, काळभोरनगर येथील एका हॉटेलमध्ये रविवारी बैठक घेतली. यावेळी भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, माजी शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, महापौर माई ढोरे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, सचिन पटवर्धन, प्रदेश सदस्य उमा खापरे, प्रवक्ते व सरचिटणीस अमोल थोरात यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “जगातील अन्य देशात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने भारतात शिरकाव केलेला आहे. त्यामुळे देशात भितीचे वातावरण निर्माण होत आहे. महाराष्ट्रातही कोरोना आजार झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेषतः पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला आहे. या संसर्गाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रशासनाकडून राबविल्या जात आहेत. परंतु, नागरिकांनीही स्वतःहून काही काळजी घेतल्यास या रोगाच्या संसर्गावर मात करणे शक्य होणार आहे. त्यासाठी नागरिकांमध्ये पुरेशी जनजागृती आवश्यक आहे. कोरोना संसर्गाबाबत सोशल माध्यमांतून अनेक समज-गैरसमज पसरत असल्यामुळे नागरिकांपर्यंत योग्य ती माहिती पोहोचणे गरजेचे आहे. अन्यथा नागरिकांमध्ये विनाकारण भितीचे वातावरण निर्माण होईल.

हे टाळण्यासाठी आणि आपल्या शहरवासीयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आता पुढे यावे. आपले सामाजिक उत्तरदायित्व समजून कार्यकर्त्यांनी नागरिकांमध्ये जनजागृती करावी. हा आजार होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी आणि कशा प्रकारे स्वच्छता राखावी याची माहिती नागरिकांपर्यंत पोचवावी. कोरोना संसर्गापासून दूर राहण्यासाठी वैयक्तिक स्तरावर कशी काळजी घेतली पाहिजे, याबाबत प्रशासनाने केलेल्या सूचना नागरिकांना द्यावेत. हात स्वच्छ धुणे, सार्वजनिक ठिकाणी जास्त वापरावयाच्या वस्तूंना स्पर्श न करणे, गर्दीची ठिकाणे टाळण्याबाबत नागरिकांना सूचित करावे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. तसेच पक्षामार्फत नागरिकांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले जाणार आहे. त्याबाबत कार्यकर्त्यांची जबबादारी त्यांनी निश्चित केली.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button